तालुकास्तरावर कोरोनाच्या सुविधा उपलब्ध करुन द्या; माकपची मागणी
तालुकास्तरावर कोरोनाच्या सुविधा उपलब्ध करुन द्या; माकपची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात कोरोना तपासण्या व उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याने सामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. तालुका स्तरावर याबाबत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर, 2020 रोजी अकोले तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शन करण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नुकताच दिला आहे.

अकोले तालुक्यातील आरोग्य अधिकारी, आशा सेविका व सरकारी आरोग्य यंत्रणेत सक्रिय असलेले विविध घटक आपापल्या परीने चांगले काम करत आहेत. मात्र तपासणीची साधने व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांना व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्त्रावाचे अहवाल येण्यासाठी दोन-तीन दिवस लागत असल्याने उपचारांत विलंब होत आहे. शिवाय नगरवरून अहवाल उशिरा येत असल्याने दरम्यानच्या काळात संबंधित व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्गाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्याची स्थिती यामुळे अधिकाधिक बिकट होत आहे. तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्येही रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा केंद्राऐवजी तालुक्यातच कोरोना तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्या, खानापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकाळचा नाश्ता, दोनवेळचे पुरेसे जेवण, अंघोळीसाठी गरम पाणी व योग्य उपचार उपलब्ध करून द्या, आशा सेविका, आशा गट प्रवर्तक, परिचारिका, अर्धवेळ परिचर, आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स यांना सर्व प्रकारची सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून द्या, कोरोना साथीत कार्यरत असलेले आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणेतील सर्वांना सुरक्षा साधने व बाधित झाल्यास प्राधान्याने उपचार उपलब्ध करून द्या, आदी मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, प्रकाश साबळे, खंडू वाकचौरे, जुबेदा मणियार, आराधना बोर्हाडे, ज्ञानेश्वर काकड, गणेश ताजणे आदिंनी केल्या आहेत. सदर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 10 सप्टेंबरला अकोले तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शन करण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे.
![]()
