शासकीय प्रयोगशाळेच्या दिरंगाईला आता ‘खासगी’चा पर्याय! जिल्ह्यातील रुग्णांचे अहवाल जलद मिळण्यासाठी खासगी प्रयोगशाळांशी करार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन एकामागून एक निर्णय समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता शासकीय प्रयोगशाळेवरील स्राव नमुने तपासण्याचा बोजा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळांशी ‘करार’ करण्यात आला असून यापुढे ग्रामीण रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतले जाणारे संशयिताचे स्राव नमुनेही खासगी प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी जाणार आहेत. या निर्णयासह त्याच्या अंमलबजावणीबाबतही नियमांची जत्री जाहीर करण्यात आली असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांसह तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून कोविडच्या संसर्गाने जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महामारीच्या दुसर्‍या संक्रमणात संसर्गाचा वेग अधिक असल्याने आणि त्यातच काही नागरिकांना कोविडचे नियम जाचक वाटू लागल्याने कठोर निर्बंधातही जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या दररोज उच्चांक गाठीत आहे. त्यातच शासकीय रुग्णालये अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दिल्या गेलेल्या स्रावांचे निष्कर्ष प्राप्त होण्यास पुन्हा आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू लागल्याने कठोर उपाययोजना करुनही जिल्ह्यातील संक्रमण आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रक काढण्यात आले असून त्याद्वारे आरटीपीसीआर चाचण्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या आदेशान्वये यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दररोज 150 तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात 75 संशयितांचे स्राव नमुने संकलित करावे लागणार आहेत. याबाबतची थेट जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय अधिकारी (सीएचओ), प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य सहाय्यक यांनी स्राव नमुने संकलित करुन त्यांची नोंद करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रोज सकाळी 11 ते 1 या कालावधीमध्ये संशयितांचे स्राव नमुने घ्यावेत व त्याबाबतची माहिती आरसीएमआरच्या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदवावी असेही आदेशित करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गोळा केलेले स्राव नमुने त्या त्या तालुक्याच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी एकत्रित करुन ठरवून दिलेल्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांकडे दररोज दुपारी साडेतीन वाजण्याच्या पूर्वी देण्याचे बंधन आहे. ही सर्व प्रक्रिया आदेशानुसार व वेळेत होते की नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यांनी या प्रणालीबाबत वारंवार माहिती घेवून खात्री करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. उपजिल्हा अथवा ग्रामीण रुग्णालयात गोळा होणारे स्राव नमुने वैद्यकीय अधीक्षकांनी दुपारी चार वाजण्याच्यापूर्वी संबंधित खासगी प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीकडे सोपवून त्याची पोहोच घेण्यासही सांगण्यात आले आहे.

येथून पुढील 27 तासांच्या आत सदर स्राव चाचणीचा निष्कर्ष संबंधित रुग्णाच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यासह आयसीएमआरच्या राष्ट्रीय पोर्टलवर त्याची नोंद करण्याचे बंधन संबंधित खासगी प्रयोगशाळेवर घालण्यात आले आहे. संबंधित प्रयोगशाळेने स्राव निष्कर्ष अहवाल देण्यास विलंब केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त आदेशही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बजावले आहेत. या निर्णयामुळे शासकीय प्रयोगशाळेवरील ताण कमी होवून जिल्ह्यातील प्रलंबित स्राव नमुन्यांची संख्या होईल व निष्कर्ष अहवाल जलदगतीने मिळतील अशी अपेक्षा आहे.


जिल्ह्यातील संक्रमणाची गती वाढल्याने अहमदनगर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधून संशयितांच्या स्राव नमुन्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यातच शासकीय प्रयोगशाळेला तांत्रिक कमतरतेसह मनुष्यबळाचाही सामना करावा लागत असल्याने शासकीय रुग्णालये अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे पाठविलेल्या जाणार्‍या स्राव नमुन्यांचे निष्कर्ष समोर यायला 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. यात रुग्ण दगावण्यासोबतच अनेकजणांचा मुक्तसंचार संक्रमण वाढीला कारणीभूत ठरतो. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाला शासकीय प्रयोगशाळेला मोठा दिलासा मिळण्यासह ग्रामीणभागातील स्राव नमुन्यांचे अहवाल जलद मिळण्यास मदत होणार आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 80392

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *