संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा हाहाकार! एकाच दिवशी तब्बल सहाशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; शहरातील शंभर जणांचा समावेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचे ‘मानवनिर्मित’ मात्र दिलासादायक चित्र दिसत असतांना संगमनेरकरांना मात्र रुग्णसंख्येचे एकामागून एक धक्के बसत आहेत. या कडीत आज संगमनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधीक आणि तालुका पातळीवरील उच्चांकी 594 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील 97 तर ग्रामीणभागातील तब्बल 497 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे संगमनेर तालुका आता 18 हजार 713 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आज समोर आलेली इतकी मोठी रुग्णसंख्या जिल्ह्याच्या कोविड इतिहासात तालुकास्तरावर पहिल्यांदाच समोर आल्याने संगमनेरात कोविडची दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अहमदनगर पाठोपाठ राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून कठोर निर्बंधही लागू आहेत, मात्र कोविडच्या संक्रमणावर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नसून अपवाद वगळता तालुक्यात दररोज उच्चांकी रुग्ण समोर येत असल्याने संगमनेरातील आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटीलेटरवर’ येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही जवळपास अडिच हजारांच्या घरात असल्याने वाढते संक्रमण संगमनेरकरांची धाकधूक वाढवणारे ठरत आहे. आजच्या उच्चांकी रुग्णसंख्येने असेच काहीसे चित्र समोर आणले असून अजूनही काही नागरिक कोविडला गांभिर्याने घेत नसल्याचा हा परिणाम असल्याचेही दिसू लागले आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेकडून समोर आलेले 190, खासगी प्रयोगशाळेचे 393 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 11 अशा 594 जणांचे उच्चांकी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातही केवळ ‘संगमनेर’ अशा अर्धवट पत्त्याच्या आधारावर नाव नोंदणी केलेल्या 60 पेक्षा अधिक जणांचा समावेश असल्याने शहराची रुग्णसंख्या अनपेक्षितपणे फुगून थेट 97 वर पोहोचली आहे. तर ग्रामीण भागातील संक्रमणाची गती आणखी वाढली असून पहिल्या संक्रमणात प्रादुर्भावापासून दूर असलेली गावे आता बाधित होवून तेथील रुग्ण समोर येवू लागले आहेत. आजच्या अहवालातून तालुक्याच्या ग्रामीणभागातील तब्बल 497 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे तालुका आता 20 हजार रुग्णसंख्या ओलांडण्याच्या दिशेने गतीमान झाला असून आजच्या स्थितीत रुग्णसंख्या 18 हजार 713 झाली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत काही अंशी घट झाल्याचे दिसत आहे. मात्र सदरची घट प्रयोगशाळांच्या दैनंदिन चाचण्यांमुळे प्राप्त झाल्याने सध्या जिल्हावासीयांना मिळत असलेला दिलासा मानवनिर्मित असल्याचेही समोर आले आहे. सध्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या स्राव नमुन्यांचे अहवाल समोर येण्यासाठी आठ ते 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधीक संक्रमित असलेल्या तालुक्यांचे अनेक अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे आहेत अथवा त्रास होत आहे अशांनी अहवालांची प्रतिक्षा करण्यापेक्षा उपचार सुरु केले आहेत, मात्र जे संशयीत पॉझिटिव्ह आहेत, मात्र त्यांना कोणतीही लक्षणे अथवा त्रास नाही अशांचा अनिर्बंध संचार सुरु असल्याने कठारे निर्बंधातही संक्रममित तालुक्यातील रुग्णगती खाली येण्याचे नाव घेत नसल्याचे विदारक चित्रही सध्या बघायला मिळत आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या 2 हजार 81, खासगी प्रयोगशाळेच्या 1 हजार 356 व रॅपिड अँटीजेनच्या 622 निष्कर्षातून जिल्ह्यातील 4 हजार 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 13 हजार 373 झाली आहे. आजच्या एकूण अहवालात संगमनेर 594, नगर ग्रामीण 377, राहाता 317, नेवासा 311, शेवगाव 306, अहमदनगर महापालिका क्षेत्र 284, पाथर्डी 272, अकोले 260, पारनेर 220, श्रीरामपूर 205, श्रीगोंदा 197, राहुरी 196, कर्जत 157, कोपरगाव 154, जामखेड 111, इतर जिल्ह्यातील 65, भिंगार लष्करी परिसर 22 व लष्करी रुग्णालयातील अकरा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या आजच्या एकूण पॉझिटिव्ह अहवालाचे सर्वात मोठी ठळक माहिती म्हणजे आजच्या अहवालातून जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमधून बहुधा पहिल्यांदाच शंभरपेक्षा अधिक रुग्णसमोर आले आहेत. त्यातील चार तालुक्यात तिनशे पेक्षा अधिक, पाच तालुक्यात दोनशेहून अधिक तर उर्वरीत तालुक्यात शंभराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. ग्रामीणभागातील वाढलेली रुग्णगती चिंता निर्माण करणारी असून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सक्रीय रुग्णांमध्येही मोठी वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.