खंडेराय विद्यालयास स्वामीनाथन मेमोरियल मेडीकल ट्रस्टची मदत संरक्षक जाळीसह संगणक प्रयोगशाळेसाठी साडेचार लाख रुपये दिले

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या श्री खंडेराय विद्यालयास पुणे येथील डॉ. स्वामीनाथन मेमोरियल मेडीकल ट्रस्टच्यावतीने सोमवारी (ता.29) संरक्षक जाळीसाठी साडेतीन लाख रुपये तर संगणक प्रयोगशाळेसाठी देखील एक लाख रुपये असे एकूण साडेचार लाख रुपयांची मदत केली आहे.

सावता महाराज सेवाभावी संस्था घारगाव संचलित खंडेरायवाडी येथील श्री खंडेराय विद्यालयाने गुणवत्तेत नावलौकिक मिळविलेला आहे. त्यांना दिवसेंदिवस आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पुणे येथील डॉ. स्वामीनाथन मेमोरियल मेडीकल ट्रस्टने पुढाकार घेतला. त्यानुसार सोमवारी छोटेखानी कार्यक्रमात संरक्षक जाळीसाठी साडेतीन लाख रुपये तर संगणक प्रयोगशाळेसाठी एक लाख रुपये अशी एकूण साडेचार लाख रुपयांची मदत केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोर डोके होते तर. उपाध्यक्षा वैशाली डोके, मुख्याध्यापक प्रमोद लेंडे आदिंसह पालक उपस्थित होते.

सदर विद्यालयात परिसरातील अनेक जवळच्या गावांतून विद्यार्थी येत असतात. त्यांना नवनवीन कौशल्ये शिकता यावीत यासाठी ग्रामस्थ कायमच लोकसहभाग देतात. परंतु, आता संस्थेने मदत केल्याने शाळेला संरक्षक भिंत उभी करता येणार असून संगणक प्रयोगशाळा देखील तयार करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रे शिकता येऊन ज्ञानात भर पडणार आहे. या कार्यक्रमास रामेश्वरी जाधव, हरिश्चंद्र ढेरंगे, सयाजी ढेरंगे, जयराम ढेरंगे, रणजीत ढेरंगे, संतोष तळेकर, संजय ढेरंगे, विकास ढेरंगे, मधुकर वाळुंज, भाऊसाहेब ढेरंगे, रामनाथ ढेरंगे, हरिभाऊ ढेरंगे, सुनील उंडे, सोपान काळे, जीवन वाळुंज, शिवाजी ढेरंगे, भाऊराव तळेकर, बबन काळे, संदीप वाळुंज, नाना तळेकर आदी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी वृक्षारोपण केले. सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक भंडलकर यांनी केले तर लावरे, यादव, उगले, मुठे, दिनकर ढेरंगे यांनी आभार मानले.
