रणरागिनींनी अडविला चोरट्यांचा मार्ग! भरदुपारी दोन सदनिका फोडल्या; ग्रामीण भागातील चोर्यांचे सत्र आता शहरात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात सुरु झालेल्या चोर्यांचे सत्र आता संगमनेर शहरातही दाखल झाले आहे. बुधवारी भरदुपारी जाणता राजा मैदानाजवळील रहिवासी इमारतीमधील दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्या. मात्र या इमारतीत राहणार्या लहान मुलांच्या सावधानतेमुळे चोरट्यांना आपला कार्यभाग अर्धवट सोडून पळावे लागले. यावेळी संबंधित इमारतीमधील अन्य सदनिकांमध्ये राहणार्या महिलांनी सामूहिकपणे चोरट्यांचा पाठलाग करुन त्यांना जेरबंद करण्याचा ऊर्जामयी प्रकारही केला. मात्र सराईत असलेल्या चोरट्यांनी आधीच सज्ज असलेल्या दुचाकीवरुन धूम ठोकली. या घटनेत इमारतीमध्ये राहणार्या आणि थेट चोरट्यांवरच झेप घेणार्या रणगिनीचा पाय मोडला आहे. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे घटनेचा तपास करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.25) दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास जाणता राजा मैदानाजवळील गिरीराजनगरमध्ये सदरची घटना घडली. याभागातील ‘स्नेहा’ या बहुमजली इमारतीत राहणार्या रामावतार राठी व सागर दुर्गावळे या दोघांच्या सदनिकांचे ताळे तोडून चोरट्यांनी घरातील ऐवज पळविण्याचा प्रयत्न केला. या इमारतीत केवळ दोनच सदनिकांना ताळे होते, उर्वरीत सदनिकांमध्ये गृहिण्या व मुले होती. दोघा चोरट्यांनी या इमारतीत प्रवेश केल्यानंतर पहिल्या मजल्यावरील रामावतार राठी यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांच्या हाती फार काही लागले नाही, मात्र जाताजाता त्यांनी कपाटात ठेवलेल्या 30 हजार रुपयांच्या महागड्या घडाळ्यावर हात मारलाच.
यानंतर त्या दोघांनीही आपला मोर्चा तिसर्या मजल्यावरील बंद असलेल्या सागर दुर्गावळे यांच्या सदनिकेकडे वळविला. त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून दोघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र कुलूप तोडताना झालेला आवाज शेजारच्या सदनिकेतील लहान मुलांच्या कानावर पडल्याने त्यांनी लागलीच आपल्या आईला शेजारी काहीतरी पडल्याचे सांगितले. त्या रणरागिनीनेही लागलीच दुर्गावळे यांच्या घरात जावून त्या चोरट्यांकडे विचारपूस सुरु केली. त्यांचा रुद्रावतार पाहून चोरटे भयभीत झाले आणि त्यांनी टेबलवर ठेवलेले 22 हजार मूल्याचे चांदीचे दागीने घेवून तेथून धुम ठोकली.
यावेळी त्या रणरागिनीने चोरऽ.. चोर.. म्हणून ओरडा केल्याने दुसर्या व पहिल्या मजल्यावरील अन्या रणरागिनीही पदर सावरीत चोरट्यांना रोखण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यातच एका रणरागिनीने तर थेट एका चोरट्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांचा पायही मोडला. सैन्यदलातून सुट्टीवर आलेल्या एका जवानानेही चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिशय सराईत असलेल्या आणि पूर्णतयारी करुनच कामगिरी बजावणार्या या चोरट्यांनी या सगळ्यांच्या हातावर तुर्या ठेवीत आधीच सज्ज असलेल्या दुचाकीवरुन सुसाट वेगाने धूम ठोकली. चोरटे इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. ‘स्नेहा’ या इमारतीत राहणार्या जवळपास सगळ्याच महिलांनी चोरट्यांना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न ऐकून सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे भारावल्या होत्या. सगळ्याच महिलांनी सावधपणे, सुरक्षिततेची काळजी घेवून अशा पद्धतीने सज्ज राहील्यास अनेक घटना टाळता येतील असे त्या म्हणाल्या. दुर्गावळे यांच्या सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांशी थेट संवाद साधून त्यांना हुसकावून लावणार्या ‘रणरागिनी’चे त्यांनी विशेष कौतुकही केले.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या चर्चा शांत होत नाही तो रात्री उशीराने साळीवाड्यातून आणखी एका अजब चोरीची घटना समोर आली. चोरट्यांनी बटवाल मळ्यातील एका पोलीस कर्मचार्याचीच दुचाकी चोरुन आणली. साळीवाड्यात आल्यानंतर खंडोबा मंदिरालगत राहणार्या बाळासाहेब उपरे यांच्या मारुती ओम्नी या वाहनावर चोरट्यांची नजर गेली. बटवाल मळ्यातून चोरलेली दुचाकी तेथेच ठेवून त्यांनी चक्क उपरे यांची ओम्नीच चोरुन नेली. यावरुन संगमनेरात चोर्यांचे सत्र सुरु झाले असून नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे.
सदरची घटना भरदुपारी सव्वाचारच्या सुमारास बहुमजली इमारतीत बंद असलेल्या केवळ दोन सदनिकांमध्ये घडली आहे. त्यावरुन चोरटे पाळत ठेवून कार्यभाग उरकीत असल्याचे दिसत आहे. तालुक्याच्या ग्रामीणभागात यापूर्वीच अशा पद्धतीच्या चोर्यांचे सत्र सुरु असताना आता त्याचे लोण संगमनेरातही येवू पाहत असल्याने नोकरीनिमित्त घराला कुलूप लावून जाणार्यांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेत पोलिसांना मोठ्या प्रमाणात पुरावे मिळाले असून खबर्यांकडूनही नेमकी माहिती मिळत असल्याने चोरटे लवकरच जेरबंद होतील असा विश्वास तपासी अधिकारी, सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे यांनी व्यक्त केला आहे.