टाकळीमियाँत पंतप्रधानांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
नायक वृत्तसेवा, राहुरी
नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकर्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची धग ग्रामीण भागात पोहोचली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे मंगळवारी (ता.1) सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.
उत्तर नगर जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी टाकळीमियाँ येथील बाजारतळावर आंदोलन केले. कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनावर लाठीहल्ला केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. कृषी कायद्यात बदल न झाल्यास देशभरात शेतकर्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटेल, तर स्वाभिमानीतर्फे राज्यातील ग्रामीण भागात आंदोलने छेडली जातील. दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी येत्या तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या 25 कार्यकर्त्यांसह दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे, असेही मोरे यांनी सांगितले.