गोधेगाव ते देवगड नदीपात्रातील दळणवळणासाठी प्रवासी बोट मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्याकडून वचनपूर्ती..
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र गोधेगाव ते श्री क्षेत्र देवगड अशा प्रवरा नदीपात्रातील दळणवळणासाठी मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन खात्याचे सभापती सुनील गडाख यांनी सुमारे 14 लाखांची प्रवासी बोट लोकार्पण केली आहे. या बोटीच्या सेवेमुळे गोधेगाव येथून देवगड येथे जाणार्या भाविकांसह शेतकरी नागरिक व विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. तर गोधेगाव ग्रामस्थांची प्रवरा नदीपात्रातील दळवळणाची समस्याही मिटणार आहे.
नेवासा तालुक्यातील गोधेगाव हे प्रवरा नदीपात्रालगतचे गाव असून येथेच श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची जन्मभूमी आहे. हे गाव देवगडपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. श्री क्षेत्र देवगड व गोधेगाव या गावांच्यामध्ये बारामाही प्रवरा नदी वाहते. त्यामुळे श्री क्षेत्र देवगड येथून गोधेगाव येथे येणार्या व गोधेगाव येथून श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी जाणार्या भाविकांना व दैनंदिन कामासाठी ये-जा करणार्या नागरिक, शेतमजूर व विद्यार्थ्यांना नदीपात्रात असलेल्या पाण्यामुळे प्रवरासंगममार्गे जावे लागत होते. त्यामुळे अगदी हाकेच्या अंतरावर असेलेले अंतर कापण्यासाठी 10 ते 12 किलोमीटर दूरवरून वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा यात वाया जात होता.
गोधेगाव ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेता श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा जन्मभूमी मंदिर येथे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत गडाख यांनी भेट दिली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी गोधेगाव ते देवगड या नदीपात्रातील प्रवासासाठी बोट मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीनुसार मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी गोधेगाव ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्यातील प्रवासी बोट उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्हा परिषद सेस 2020-2021 च्या निधीमधून विशेष प्रयत्नपूर्वक सुमारे 14 लाख रुपयांची बोट गोधेगाव ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली आहे.
सदर बोटीचे रविवारी (ता.2) गोधेगाव जन्मभूमी मंदिर येथे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुळा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी संचालक सीताराम जाधव, प्रवरासंगमचे सरपंच संदीप सुडके, गोधेगावचे सरपंच राजेंद्र गोलांडे, प्रदीप पठाडे, उपसरपंच गोपीचंद पल्हारे, दिलीप शेलार, भगवान काळे, नेवासा पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय घुले, ग्रामविकास अधिकारी महेश शेळके, दत्तात्रय जाधव, शांतीलाल पल्हारे, दत्तात्रय पिंपळे, राणू माळी, संजय पल्हारे, पप्पू शेख, मिनीनाथ जाधव, विजय घोलप, गणेश घाडगे, संतोष मोरे, बापू शेलार, संतोष गोलांडे, नवनाथ घाडगे, शुभम पठाडे, नवनाथ गाडेकर, महेश शेलार, गणेश नरोडे आदी उपस्थित होते.