रुग्णवाहिकेतच डॉक्टरचे महिलेसोबत दुष्कृत्य

नायक वृत्तसेवा, नेवासा
‘देवदूत’ म्हणून ओळख असणार्या एका डॉक्टरने वैद्यकीय पेशाला काळिमा फासला आहे. रुग्णाला रुग्णवाहिकेतून नेत असतानाच डॉक्टरने दुष्कृत्य केले आहे. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात असणार्या 108 रुग्णवाहिकेत कार्यरत असणार्या डॉक्टरने रुग्णवाहिकेतून रुग्णाला अहमदनगर येथे घेऊन जात असताना रुग्णाच्या नातेवाईक महिलेसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन नेवासा पोलिसांत संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या गर्भवती सूनेस रक्तदाबाचा त्रास होत असल्याने तिला नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्या महिलेस पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यास सांगितले. दरम्यान, पीडित महिलेसह तिचा पती, त्यांची पुतणी हे सूनेसह गुरुवारी (ता.28) रात्री दहा वाजता नेवासा फाटा येथील 108 रुग्णवाहिकेने अहमदनगरला जात असताना नेवासा फाटा ते अहमदनगर दरम्यान या रुग्णवाहिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरने अश्लिल चाळे सुरू केले. विशेष म्हणजे त्या रुग्णवाहिकेत तिचा पतीही होता. तरीही डॉक्टरने हे कृत्य केले. घटनेवेळी संबंधित महिला घाबरलेली होती. त्यामुळे तिने नुकतीच नेवासा पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
