सावरगाव घुलेत जेजुरी मंदिर जिर्णोद्धारासह मूर्ती प्राणप्रतिष्ठा रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथेचेही आयोजन
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील श्री क्षेत्र सावरगाव घुले येथे चंपाषठ्ठी उत्सवानिमित्ताने जेजुरी मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा मंगळवार 22 ते मंगळवार 29 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. याचबरोबर रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथेचेही आयोजन करण्यात आले आहे.
सावरगाव घुले येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. चंपाषष्ठीला जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा रामाणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या उपस्थितीत होणार आहे. मंगळवार 22 नोव्हेंबरपासून दररोज सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत रामायण कथा संपन्न होणार आहे. बुधवार 29 नोव्हेंबरला सकाळी गावातून खंडोबा मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊन दुपारी बारा वाजता खंडोबा मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर ढोक महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
खंडोबा मंदिर प्रांगणात भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला असून दररोज या मंडपामध्ये पाच हजाराहून अधिक भाविकांची बसण्याची व्यवस्था खंडोबा देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि समस्त गावकर्यांनी उभी केली आहे. सप्ताह दरम्यान अनेक दानशूरांनी अन्नदानासाठी मदत केली आहे. तसेच रामाणाचार्य ढोक महाराज यांच्या स्वागतासाठी भव्य कमानही उभारण्यात आली असून ढोक महाराजांच्या आगमनावेळी पठार भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दररोज रामायण कथा संपल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचीही सोय करण्यात आली आहे. या रामायण कथेस संगमनेर तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव घुले यांच्यावतीने करण्यात आले आहे.