संगमनेरच्या हिंदुत्त्वाचा बुरुज ढासळला; ज्येष्ठनेते राधावल्लभ कासट यांचे निधन! संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाचा पाईक हरपला : ना. बाळासाहेब थोरात ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, संगमनेरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राधावल्लभ कासट उर्फ दादा (वय 72) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. संगमनेर तालुक्यातील संपूर्ण एका पिढीला हिंदुत्त्वाचा मार्ग दाखवणारे कासट अवघ्या जिल्ह्याला ‘दादा’ म्हणून परिचयाचे होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूने संगमनेर शहरातील हिंदुत्त्वाचा बुरुज ढासळल्याची भावना असंख्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दादांच्या निधनाने भारतीय जनता पार्टी एका अनुभवी आणि धुरंदर नेत्याला मुकली आहे. राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी विरोधी पक्षनेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदींसह संगमनेरातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दादांच्या निधनांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’ असं ब्रीद असलेल्या संगमनेर नगरपालिकेत ‘दादा’ नावाचा विशेष दरारा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूशीतून घडलेल्या दादांनी सन 1975 साली पालिकेची निवडणूक जिंकून पालिकेच्या सभागृहात पहिल्यांदा पाय ठेवला. 1975 ते 1982, 1986 ते 2006 या कालावधीपर्यंत ते प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत विजयी झाले. 2006 साली त्यांना पराभवाचा सामना करावा, मात्र न डगमगता त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले. त्यानंतर 2011 साली त्यांनी पुन्हा निवडणूक लढविली आणि ते पुन्हा सभागृहात पोहोचले. मात्र 2016 सालच्या निवडणूकीत त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.

13 मार्च 1987 रोजी त्यांची संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पालिकेच्या संपूर्ण वर्तुळात ‘दादा’ नावाचा वेगळा दबदबा निर्माण केला होता. हा कालखंड पालिकेतील अनेक कर्मचारी आजही आठवणीने सांगतात. 2011 ते 16 ही त्यांची पालिकेतील अखेरची कारकीर्द ठरली. या कालावधीत विरोधीपक्षाचे गटनेते म्हणून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सत्ताधारी पक्षालाही दखल घ्यावी लागत, इतका त्यांचा दरारा होता.

जातीय आणि प्रशासकीय दंगलींचा ‘काळा काळ’ म्हणून 1970 ते 1990 या दोन दशकांकडे पाहिले जाते. या कालावधीत संगमनेर शहरात जातीय दंगलींबरोबरच प्रशासनाविरोधातही आगडोंब उसळून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचा इतिहास आहे. त्यावेळी दादांच्या एका शब्दावर शेकडों कार्यकर्ते उभे राहत व त्यांच्या शब्दावर वाट्टेल ते करायची तयारी ठेवतं. तणावाच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाकडून दादांना शांतता राखण्यासाठी आवाहन करण्याचेही साकडे घातले जात आणि दादांच्या एका शब्दावर संतप्त शेकडों कार्यकर्ते शांत होवून घरी जात इतके आदराचे स्थान त्यांनी निर्माण केले होते. पक्षातील अंतर्गत कलहातून त्यांना भारतीय जनता पार्टीने सहा वर्षांसाठी निलंबितही केले होते, मात्र नंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले.

आयुष्यातील साडेचार दशके पालिकेच्या प्रत्यक्ष कामकाजाशी त्यांचा संबंध आल्याने पालिका अधिनियमातील तरतूदी त्यांच्या तोंडपाठ झाल्या होत्या. म्हणून त्यांना पालिका सभागृहातील ‘भिष्म’ म्हणूनही संबोधले जात. अनेकवेळा पालिकेतील सत्ताधारी गटातील पदाधिकारीही कामकाजाबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेत. विरोधी गटाची सत्ता असतांनाही ‘नियोजन समिती’चे सभापतीपद मिळविणारी एकमेव व्यक्ति अशीही त्यांची ख्याती होती. संगमनेरात हिंदुत्त्वाची ज्योत तेवती ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनाच्या वेळीही संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यातील शेकडों कारसेवकांसह ते अयोध्येत पोहोचले होते. त्याचवेळी कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशिद उध्वस्त केली, अशा स्थितीतही त्यांनी संगमनेरातील सर्व कारसेवकांना सुखरुप संगमनेरात आणले.

आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला, त्यातून ते स्वतःला सावरु शकले नाहीत आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वपक्षीय नेते, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, हिंदुत्त्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला होता. स्वर्गीय राधावल्लभ कासट यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने आपण आणखी एका ‘ढाण्या वाघाला’ मुकलो आहोत अशी शोकाकूल प्रतिक्रीया त्यांच्या चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.

पालिकेच्या कामकाजात अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून दादांची ओळख होती. आयुष्यभर एका विचाराशी त्यांची बांधिलकी आणि केवळ विरोधाला विरोध न करता विकास कामांना नेहमी पाठबळ ही त्यांची वृत्ती संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा दर्शविणारी होती. राजकारण करतांना त्यांनी अनेक प्रसंगात टोकाची भूमिकाही घेतली, मात्र त्यातून त्यांनी कधीही ‘मनभेद’ होवू दिले नाहीत. राजकारण फक्त निवडणूकीपूरते, इतरवेळी समाजकारण हे सूत्र त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासले. त्यांच्या निधनाने आपण एका अभ्यासु आणि लढवय्या व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे.
बाळासाहेब थोरात
महसुलमंत्री, महाराष्ट्र राज्य

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात राधावल्लभ कासट यांनी स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण केला होता. सार्वजनिक प्रश्नांसोबतच अन्यायाच्या विरोधात पक्षाच्या पलिकडे जावून संघर्ष करण्याचा त्यांचा स्वभाव होता. लोकनेते, पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाच्या माध्यमातून वेळप्रसंगी पक्षीय भूमिका आड येवू न देता त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. राजकीय, सामाजिक चळवळीत सर्वच घटकांना सामावून घेण्याची त्यांची वेगळी हातोटी होती. सामान्यांच्या प्रश्नांसाठी चळवळ आणि न्यायासाठी शेवटपर्यंत संघर्ष करणारा लढवय्या आपल्यातून निघून गेला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील
आमदार : शिर्डी मतदार संघ

