संगमनेरातील दोघांसह जिल्ह्यातील पंच्याहत्तर जणांचा कोविडने मृत्यू! जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम; मात्र संगमनेरचा आलेख उंचावलेलाच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या बाबतीत संगमनेर तालुका अजूनही आघाडीवर असून गेल्या अवघ्या तीनच दिवसांत तालुक्यात तब्बल बाराशे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील बहुतेक अन्य तालुक्यातील रुग्णसंख्येला ओहोटी लागलेली असतांना संगमनेरातून मात्र दररोज उच्चांकी रुग्ण समोर येत असल्याने येथील यंत्रणेतील घटकांसह नागरिकांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आजही संगमनेर तालुक्यात सर्वाधीक 294 रुग्ण आढळून आले. त्यामुळे सर्वाधीक रुग्णवाढ होणार्या जिल्ह्यातील तालुक्यात संगमनेर दुसर्यास्थानी पोहोचला आहे. आज शहरातील दोघांसह जिल्ह्यातील 75 जणांचा कोविडने बळीही गेला आहे. त्यासोबत आजही मोठ्या संख्यने रुग्ण समोर आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 20 हजार 659 झाली आहे. तर सक्रीय रुग्णांची आजची संख्या 1 हजार 645 असून रुग्ण बरे होण्याची सरासरी 91.16 टक्के झाली आहे.
गेल्या सोमवारपासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील रुग्णगतीला ओहोटी लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याचे काहीसे समाधानकारक चित्र दिसत असतांनाच संगमनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला आहे. एकीकडे जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत निम्म्याहून अधिक घट होत असतांना दुसरीकडे संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत मात्र दुप्पटगतीने वाढ सुरु आहे. त्यामुळे कोरोना मुक्तिच्या दिशेने मार्गक्रमण करणार्या जिल्ह्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांतच संगमनेर तालुक्यात तब्बल 1 हजार 183 इतके उच्चांकी रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच गेल्या चोवीस तासांत शहरातील साळीवाडा परिसरातील महिला व साईनगर मधील तरुणाचा कोविडने बळीही गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील संक्रमणाचा वेग नियंत्रणात येण्यास अजूनही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
आज जिल्हा प्रयोगशाळेकडून अवघे दोन, खासगी प्रयोगशाळेचे 197 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या 95 अहवालातून संगमनेर तालुक्यातील उच्चांकी 294 रुग्ण समोर आले. त्यात शहरातील अवघ्या 29 तर अन्य तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. उर्वरीत 263 रुग्ण ग्रामीणभागातून समोर आले आहेत. आज शहरातील परदेशपूरा येथील 39 वर्षीय तरुण, जून्या पोलीस वसाहतीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी नगरमधील 33 वर्षीय महिला, इंदिरानगर मधील 71 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम व 18 वर्षीय तरुणी, गणेशनगर मधील आठ वर्षीय मुलगा, देवाचा मळा येथील 24 वर्षीय महिला, नायकवाडपूरा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 52 वर्षीय महिला,
चैतन्य नगरमधील 34 वर्षीय महिला, जय जवान चौकातील 20 व 19 वर्षीय तरुणी, माळीवाड्यातील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनता नगरमधील 36 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, सुयोग कॉलनीतील 65 वर्षीय महिला, कुरण रोडवरील 20 वर्षीय तरुणासह 20 वर्षीय तरुणी, मालदाड रोडवरील 27 व 25 वर्षीय तरुण, देवीगल्लीतील 33 वर्षीय महिला, अभिनव नगरमधील 21 वर्षीय तरुणी, जाणता राजा मैदान परिसरातील सात वर्षीय मुलगा व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 व 29 वर्षीय महिलांसह 58 व 45 वर्षीय इसम आणि 26 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या रुग्णावाढीने संगमनेर तालुका जिल्ह्यातील दुसर्या क्रमांकाच्या रुग्णवाढीच्या स्थानी पोहोचला असून एकूण रुग्णसंख्या 20 हजार 659 झाली आहे. तालुक्यात 1 हजार 645 सक्रीय रुग्ण असून आत्तापर्यंत 18 हजार 916 जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात रुग्ण बरे होण्याच्या सरासरीतही मोठी सुधारणा झाली असून आजच्या स्थितीत तालुक्याची टक्केवारी 91.16 झाली आहे.
जिल्ह्याच्या एकूण संक्रमणाला लागलेली ओहोटी मात्र आजही कायम असल्याचे दिसून आले. आज शासकीय प्रयोगशाळेकडून 284, खासगी प्रयोगशाळेकडून 1 हजार 38 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 1 हजार 170 अहवालांमधून संगमनेरातील 294, अकोले 270, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 240, नेवासा 227, श्रीगोंदा 224, पारनेर 186, नगर ग्रामीण 184, राहाता 153, श्रीरामपूर 144, कोपरगाव 136, पाथर्डी 119, राहुरी 105, शेवगाव 91, कर्जत 41, जामखेड 35, इतर जिल्ह्यातील 34, भिंगार लष्करी परिसरातील 6, इतर राज्यातील दोन आणि लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 44 हजार 809 झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील 75 नागरिकांचा बळीही गेला आहे. आज एकीकडे 2 हजार 492 रुग्ण समोर आले, तर दुसरीकडे 3 हजार 419 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले. आजच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील 17 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत 2 लाख 24 हजार 556 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी 91.73 टक्के आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 650 नागरिकांचे कोविडने बळी गेले आहेत.