जीवनात आव्हाने स्वीकारल्यास नक्की यश मिळते ः वाकचौरे व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

 

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यशासाठी सातत्याने कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यशाचा उंबरठा ओलांडणे सहज शक्य आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चौकसवृत्ती यामुळे आपल्याला जीवनात यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी केले.

संगमनेर येथील व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विद्यापीठाचे प्रमुख नामदेव गुंजाळ होते. तर व्यासपीठावर डॉ. हर्षवर्धन गुंजाळ, सुनील सुतार, प्रा. भालेराव, प्रा. मिश्रा उपस्थित होते.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात वाकचौरे म्हणाले, यश प्राप्त करण्यासाठी आपल्यासमोर आव्हाने असण्याची गरज असते. परिस्थिती कोणतीही असली तरी सुद्धा त्यावर मात करत आपण यशस्वी होऊ शकतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व आहे. पण योग्यवेळी योग्य निर्णय घेता आला तरच भविष्यात करियर म्हणून यशस्वीता प्राप्त करता येते. पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याबरोबर प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शाळा उत्तम असायला हव्यात याचा अर्थ केवळ इमारती नव्हे, तर तेथे काम करणारे शिक्षक यांच्या गुणवत्तेवरच शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून असते असे मत त्यांनी व्यक्त केले. मुलांचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरजही आहे. नामदेव गुंजाळ यांनी स्पर्धेच्या दृष्टीने संगमनेर सारख्या शहरात शिकवणीचे वर्ग सुरू करून एका छताखाली विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मतही वाकचौरे यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. नामदेव गुंजाळ म्हणाले, शिक्षणासाठी योग्यवेळी गुंतवणूक केली गेली तर आपल्याला भविष्यासाठी त्याचा मोठा लाभ होत असतो. शिक्षणाच्या दृष्टीने महानगरांमध्ये असणार्‍या संधी व सुविधा संगमनेरसारख्या शहरात निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. एकाच छताखाली विद्यार्थ्यांच्या विकासाचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या विविध क्षमतांचा विकास करण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा देताना कमीत कमी फी आकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक बांधिलकी कायम ठेवून हा प्रवास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन दीपक पावसे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सर्वच सदस्यांनी प्रयत्न केले.

Visits: 47 Today: 1 Total: 434895

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *