संगमनेरात कोविडच्या नावाने ‘चांगभलं’! संचारबंदीतही नागरिकांचा ‘मुक्त संचार’; पोलीस प्रशासनच पडले संभ्रमात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवारी रात्री आठ वाजेपासून ‘कठोर निर्बंध’ लावण्यात आले. मात्र आज सकाळी संगमनेरात त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. शहरातील विविध भागात हातात पिशव्या घेवून नागरिक भाजी, किराणा, दुध अथवा औषधाच्या बहाण्याने संचारबंदीतही नाकाबंदीवरील पोलिसांच्या नाकावर टिच्चून ‘मुक्त संचार’ करीत असल्याचे दिसत होते. संशयावरुन एखाद्याची चौकशी करता एकसारखी कारणे समोर आल्याने पोलिसही नेमकी कोणावर कारवाई करावी अशा संभ्रमात असल्याचे चित्रही चौकाचौकात दिसत होते. अनेक किराणा दुकानांमध्ये अत्यावश्यकच्या नावाखाली गुटखा, सिगारेट अथवा पाण्याच्या ‘थंडगार’ बाटल्या घेणार्‍यांची गर्दीही दिसून आली. एकंदरीत संगमनेरात एकीकडे संचारबंदीची एैशीतैशी करुन अनेकजण कोविडच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष करतांना दिसले, तर त्याचवेळी ऑक्सिजनची खाट मिळावी यासाठी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधावही नजरेस पडली. समाजातील काही हुल्लडबाज मानसिकतेमुळे संगमनेरातील कोविडचे संकट अधिक गहिरे झाले आहे हे मात्र खरं.


राज्यातील काही जिल्ह्यांसह अहमदनगरमध्ये कोविड संक्रमणाचा अत्यंत वेगाने प्रादुर्भाव होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतेक ठिकाणची रुग्णालये तुडूंब झाली आहेत. राज्यातील आणि त्यातही अहमदनगर जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग अधिक असल्याने दररोज समोर येणारे रुग्ण आणि उपचार पूर्ण करुन घरी जाणारे रुग्ण यांच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची स्थिती समोर दिसत आहे. अशावेळी नागरिकांच्या संचारावर मर्यादा आणून या महामारीची साखळी तोडणं अत्यंत महत्त्वाचे असल्याने राज्य सरकारने बुधवारी (ता.14) रात्री आठ वाजेपासून राज्यात कलम 144 अंतर्गत नागरिकांच्या संचारावर मर्यादा आणल्या आहेत. मात्र याबाबतच्या प्रत्यक्ष आदेशात मात्र अत्यावश्यकच्या नावाखाली हातभर यादी जोडून अनेक व्यवसायांना खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेवून अनेक महाभाग गावभर बोकाळत फिरत असून कोविडलाच आव्हान देत आपल्या परिवाराचे आरोग्य धोक्यात आणू पाहत आहेत.


केवळ सर्वसामान्य नागरिकांचाच नव्हेतर खुद्द पोलिसांचाही संभ्रम करणार्‍या या ‘अनोख्या संचारबंदीत’ रस्त्यावर फिरणार्‍यांंची पोलिसांनी चौकशी केली असता किराणा, दुध, भाजी अथवा औषधाचे कारण सांगीतले जात आहे. सर्रास सुरु असलेल्या या प्रकारांचीं सत्यता तरी कशी पडताळावी असा प्रश्न पोलिसांनाच पडला आहे. त्यामुळे काही भागातील नाकाबंदीवरील पोलिसांनी झाडाच्या सावल्या धरुन काही नागरिकांच्या मुर्खपणात वावरत असलेला अदृष्य कोविड बघत राहण्यातच धन्यता मानल्याचेही चित्र दिसत होते. हा सर्व प्रकार अत्यंत भयंकर आणि घातक असूनही नागरिकांना अजूनही त्याबाबतचे गांभिर्य समजत नसल्याने संगमनेरातील कोविड संक्रमण सध्या प्रचंड भरात असून आजही जिल्ह्यासह कोविडने संगमनेरातील आजवरचा सर्वात मोठा 267 रुग्णसंख्येचा नवा उच्चांक गाठला आहे.


शासनाच्या आदेशान्वये पोलिसांनी रात्री आठपासूनच शहरात संचारबंदीची अंमलबजावणी सुरु केली होती. त्यासाठी आज सकाळपासूनच अकोलेनाका, जोर्वेनाका, निमोणनाका व दिल्लीनाका या शहराला जोडणार्‍या रस्त्यांसह नवीन नगर रोड, बसस्थानक या भागात तपासणी नाके सुरु करण्यात आले होते. मात्र जसजसा दिवस वर चढत गेला तसतसे नागरिक ‘संचारबंदीतील’ शहराचे दर्शन घेण्यासाठी हातात पिशवी अथवा डॉक्टरांची चिठ्ठी घेवून ‘अत्यावश्यक’च्या नावाखाली ‘मुक्त संचार’ करण्यासाठी बाहेर पडल्याचे वेदनादायी चित्र दिसू लागले. पोलिसही प्रत्येकाकडून एकाच प्रकारची उत्तरे, पिशवीत एखादी भाजी अथवा घरातून पिशवीत घेतलेला साखर, शेंगादाण्याचा पुडा दाखवून सहीसलाम सुटू लागल्याने हतबल झालेत आणि शेवटी त्यांनी परिसरातील एखाद्या झाडाची सावली धरुन नागरिकांकडून कोविडला उघडपणे दिले जाणारे आवतणं आणि अदृष्य कोविडचा संचार बघण्यातच ‘राम’ मानून कोविडच्या नावानं चांगभलं म्हणत मूकदर्शक होण्याची भूमिका स्विकारल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसून आले.


जिल्ह्यात कोविड संक्रमणाची गती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदीची घोषणा केली, मात्र अत्यावश्यकच्या नावाखाली डझनभर आस्थापना सुरु ठेवण्याची परवानगी दिल्याने सरकारचा हा निर्णय कोविड संक्रमण थोपवण्यास पुरेसा ठरणार नसल्याचे आदेशाच्या पहिल्याच दिवशी स्पष्टपणे दिसून आले. एकीकडे संचारबंदीतही मुक्त संचार करणारे हुल्लडबाज आणि दुसरीकडे त्यामुळे संक्रमणाच्या चक्रात फसलेल्यांची ऑक्सिजनची खाट मिळवण्यासाठीची धडपड असं परस्पर विरोधी भयानक चित्र यानिमित्ताने संगमनेरसह जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले.

Visits: 6 Today: 1 Total: 30558

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *