श्रीरापूरमध्येही रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांचा पुरवठा होत नसल्याने रुग्ण व नातेवाईक चिंताग्रस्त आहेत. मात्र, या संधीचा फायदा उठवत अनेक संधीसाधू वाहत्या गंगेत हात धुवून रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करत असल्याचे वारंवार पहावयास मिळत आहे. असाच प्रकार श्रीरामपूर शहरात घडला असून, रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील संजय रुपटक्के यांचे परिचित असलेले पुंजाजी केदारी यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यामुळे केदारी यांनी रुपटक्के यांच्याकडे त्याकरिता 40 हजार रुपये मदतीची मागणी केली. कोल्हार येथील एक व्यक्ती दोन इंजेक्शन केदारी यांना उपलब्ध करून देणार होता. त्यावरून रुपटक्के तसेच कार्यकर्ते गणेश जायगुडे व सोमनाथ कदम हे शहरातील साखर कामगार रुग्णालयाजवळ आले. तेथे केदारी यांचे कुटुंबीय इंजेक्शन विक्रेत्याच्या प्रतीक्षेत उभे होते. भाजप कार्यकर्त्यांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. थोड्याच वेळात दोन पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. ठरल्याप्रमाणे कोल्हार येथील एक व्यक्ती दुचाकीवर त्याच्या एका सहकार्‍यासमवेत तेथे आली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट झाली आणि कोल्हार येथील एका व्यक्तिला पकडण्यात कार्यकर्त्यांना यश आले. मात्र, बार्शी (जि.सोलापूर) येथील एक इसम फरार झाला. पकडलेली व्यक्ती शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला असून, तेथील डॉक्टरांनीच आपल्याला इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपर्यंत याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्त्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यासमोर पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी पाचारण करुन शुभम श्रीराम जाधव (वय 21, रा.कोल्हार, ता.राहाता) व प्रवीण प्रदीप खुने (वय 23, रा.भातांबरी, ता.बार्शी, जि.सोलापूर) यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 1 लाख 46 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Visits: 16 Today: 3 Total: 117225

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *