कोपरगावमध्ये 42 कैद्यांना कोरोनाची लागण

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. रोज बाधितांच्या संख्येत नव्याने भर पडून उच्चांक गाठत आहे. त्यातच शहरातील दुय्यम कारागृहातील तब्बल 42 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने तुरंग प्रशासन हैराण झाले आहे.

दरम्यान, बुधवारी (ता.7) दिवसभरात तालुक्यातील 199 जणांना कोरोनाची लागण झाली. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून, लॉकडाउन केले तरी फारसा परिणाम दिसून आला नाही. रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 81, अहमदनगर येथील अहवालात 94, तर खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. तर दुय्यम कारागृहातील 80 टक्के कैदी बाधित झाल्याने इतर कैद्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली आहे. यावरुन तालुक्यात लॉकडाऊन झाले. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसून रस्यावर गर्दी दिसून येत आहे.
