प्रत्येकाने कोरोना संकट गांभीर्याने घ्यावे ः आ.डॉ.तांबे गर्दी टाळत मास्क वापरण्याचेही केले आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत संसर्गाचा वेग तीव्र आहे. तरुणांसह दररोज वाढणारी रुग्णसंख्या ही अत्यंत चिंताजनक असून प्रत्येकाने कोरोना संकट हे अतिशय गांभीर्याने घेत गर्दी टाळत मास्कचा वापर करावा, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, मागील एक वर्षापूर्वी कोरोनाचा विषाणू महाराष्ट्रात आला. बोलता-बोलता वर्ष ठप्प झालं. अनेकांनी आपला जीव गमावला. या सर्व काळात शासनाने कोरोना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत चांगले होते. मात्र मध्यंतरी नागरिकांच्या ढिलाईमुळे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अत्यंत तीव्र असून संसर्गाचा वेग जास्त आहे. या लाटेमध्ये तरुणांना व लहान मुलांनाही जास्त संसर्ग होतो आहे हे चिंताजनक आहे. प्रत्येकाने काही लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घेवून उपचार घ्यावे. याचबरोबर विनाकारण बाहेर पडणे टाळा. सोशल डिस्टन्सचे पालन करा. मास्कचा वापर केलाच पाहिजे. तातडीने लस घ्या. लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढत आहे. लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नका. शासकीय यंत्रणेनेही लसीकरणाला प्राधान्य देत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रशासन त्यांच्या पद्धतीने चांगले काम करते आहे. नागरिकांचेही कर्तव्य आहे की स्वतःची काळजी घेणे. स्वतःची काळजी घेतली तर कुटुंबाची काळजी आपोआप घेतली जाईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फुफ्फुसापर्यंत गेल्यानंतर संकट ओढवू शकते. याशिवाय त्या माणसाला पुढील काळातही काळजी घ्यावी लागते. म्हणून कोरोना हा शत्रू आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरलाच पाहिजे. याचबरोबर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. प्रत्येकाला पुन्हा मागचे आपले वैभवाचे दिवस अनुभवायचे आहेत. भरलेल्या शाळा, आनंदाचे वातावरण हे चांगले दिवस होते. ते पुन्हा अनुभवायच्या असतील तसेच समृद्ध आणि प्रगत देशांत व्हायचा असेल, सांस्कृतिक वातावरण चांगले करायचे असेल तर कोरोनाला हरवणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी एकजुटीने लढूया व कोरोनावर मात करूया असेही ते म्हणाले.

Visits: 100 Today: 1 Total: 1104036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *