मार्चमध्ये बिघडली जिल्ह्याची सुधरलेली कोविड स्थिती! संक्रमणात मोठी वाढ होवून कोविडने तोडले आजवरचे सर्व विक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संक्रमणाच्या वर्षपूर्तीलाच जिल्ह्यात सुरू झालेल्या कोविडच्या दुसर्या संक्रमणाने जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांना पछाडले आहे. जिल्हावासियांना रोजच्या मोठ्या रुग्णसंख्येचे धक्के अस्वस्थ करीत असून आरोग्य यंत्रणांवरील ताण शतपटीने वाढला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये संक्रमणाचा वेग प्रचंड असून सक्रीय रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवल्या आहेत. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात तब्बल 19 हजार 41 रुग्णांची भर पडली असून अवघ्या एकाच महिन्यात 75 जणांचा बळीही गेला आहे. अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यात वर्षभरातील उच्चांकी रुग्णसंख्या नोंदविली गेली असून आजच्या स्थितीतही या तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे.

गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला. 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात 6 हजार 901 रुग्ण दर महिन्याला या वेगाने जिल्ह्यात 69 हजार 14 रुग्ण आढळले. तर प्रत्येक महिन्यात 105 रुग्ण दगावले. जानेवारीपासून त्यात घट होवू लागली, आणि जिल्हा कोविड संक्रमणातून बाहेर पडतोय असेही चित्र निर्माण झाले. मात्र 17 फेब्रुवारीपासून संक्रमणाने पुन्हा गती घेतली ती आजही कायम आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील प्रादुर्भाव सर्वाधिक भरात आहे. त्यातही अहमदनगर महापालिका क्षेत्र, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये संपूर्ण वर्षभरातील सर्वाधीक रुग्णसंख्या मार्चमध्ये नोंदविली गेली आहे. त्यावरुन जिल्ह्यातील दुसर्या संक्रमणाची दाहकता अधोरेखीत होते.

फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी (29 फेब्रुवारी) जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 75 हजार 881 होती तर मृतांची संख्या 1 हजार 143 होती. रुग्ण बरे होण्याचा दरही 96.98 टक्के होता. मार्चने मात्र या परिस्थितीत आमुलाग्र बदल घडवून आणताना जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांची चिंता वाढवली आहे. मार्चमधील गेल्या 31 दिवसांत दररोज सरासरी 614 रुग्णांची भर पडून जिल्ह्यात 19 हजार 41 रुग्ण वाढले. या कालावधीत मृत्यूचा दर मात्र कमी झाल्याचे दिसून आले. मात्र त्यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 97 टक्क्यावरुन 5.34 टक्के घसरुन तो 91.64 टक्के झाला.

तालुकानिहाय विचार करता महिन्याभरात सर्वाधीक रुग्णवाढ अहमदनगर महापालिका क्षेत्रात झाली. दररोज सरासरी 224.42 रुग्ण या गतीने अहमदनगरमध्ये तब्बल 6 हजार 957 रुग्णांची भर पडली. त्याखालोखाल राहाता सरासरी 67.58 रुग्ण वेगाने 2 हजार 95, संगमनेरमध्ये सरासरी 54.61 गतीने 1 हजार 693 रुग्ण, कोपरगावमध्ये सरासरी 42.42 रुग्ण दररोज या वेगाने 1 हजार 315 रुग्ण तर श्रीरामपूरमध्ये दररोज 37.23 रुग्ण या गतीने तब्बल 1 हजार 154 रुग्णांची भर पडली. कोविडच्या जिल्ह्यातील एकूण इतिहासात या तालुक्यांमध्ये झालेली मार्चमधील रुग्णवाढ सर्वाधीक आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा वेग सर्वाधीक होता. त्या महिन्यात एकट्या संगमनेर तालुक्यात दररोज सरासरी 51 रुग्ण या गतीने 1 हजार 529 रुग्णांची भर पडली होती. मार्चने मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची कोविड स्थिती बिघडवली. संगमनेर तालुक्याच्या प्रादुर्भावातही गेल्या 31 दिवसांत प्रचंड वाढ होवून सरासरी दररोज 55 रुग्ण या गतीने तालुक्यात तब्बल 1 हजार 693 रुग्ण वाढले. जिल्ह्यात कोविड भरात असतांना संगमनेर तालुक्यात झालेल्या सर्वाधीक रुग्णवाढीपेक्षा ही संख्या 164 रुग्णांनी अधिक आहे. वर्षभराच्या संक्रमणानंतर कोविड जातोय असे वाटत असतांना फेब्रुवारीतील विवाह सोहळ्यांनी त्याला पुन्हा निमंत्रण दिलं आणि जिल्ह्याची सुधारलेली कोविड स्थिती आजच्या अवस्थेत अतिशय चिंताजनक बनली आहे. रोज समोर येणारे रुग्ण आणि सक्रीय संक्रमितांची वाढती संख्या यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत असून कोविडचे नियम पाहून आपणच आपली काळजी घ्यावी अशी आजची स्थिती आहे.
