तालुक्याच्या रुग्ण संख्येने ओलांडले बारावे शतक!
शहरातील आठ जणांचे 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरू झालेला कोरोनाचा कहर आजही कायम असून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून तालुक्यातील रुग्ण संख्येत तीस रुग्णांची भर पडली आहे. तालुक्याने बाधित रुग्णांचे बारावे शतकही पूर्ण केले आहे. आजही तालुक्याच्या रूग्ण संख्येत तीसची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 1 हजार 212 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 1 हजार दोन रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आहेत, तर केवळ 188 रुग्णांवर सक्रीय संक्रमित म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज प्राप्त झालेल्या तीस अहवालां पैकी पाच जणांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत. आजच्या अहवालातून शहरातील आठ जणांची चाचणी पॉझिटिव आली आहे. यात रंगार गल्लीतील 62 वर्षीय इसम व तीस वर्षीय महिला, मोमीनपूरा येथील 44 वर्षीय व 76 वर्षीय महिला, कुंभारवाडा परिसरातील बारा वर्षीय बालक, गणेशनगर मधील 80 वर्षीय महिला व 45 वर्षीय तरुण, तर देवाचा मळा परिसरातून 39 वर्षीय तरुण आदींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज तालुक्यातही बावीस रुग्ण आढळून आले आहेत. त्यात तीगाव येथील सतरा व दहा वर्षीय मुलींसह 13 वर्षीय बालकाचा बाधितांमध्ये समावेश आहे. यासह चिंचोली गुरव येथील 67, 42 व 38 वर्षीय इसमांना तर पिंपरी लौकी येथील तीन वर्षीय चिमुरडीसह 29 आणि 60 वर्षीय महिलांना तसेच सतरा व अठरा वर्षीय तरुणांना संक्रमण झाले आहे. चंदनापुरी येथील 69 व 55 वर्षीय पुरुषांनाही कोविडची लागण झाली आहे.
याशिवाय हिवरगाव पावसा येथील 80 वर्षीय वृद्धाला, कनोली येथील 49 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, जवळेकडलग येथील 19 वर्षीय तरुणी, शहरालगतच्या घुलेवाडी येथील 40 व 27 वर्षीय तरुणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
आज तालुक्याच्या रुग्ण संख्येत एकाच वेळी 30 रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्येने बारावे शतक पूर्ण केले असून तालुक्यातील बाधितांची संख्या 1 हजार 212 झाली आहे. यातील 1 हजार 2 रुग्णांनी करोनाचा पराभव करून घर गाठले असून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील केवळ 188 जणांवर शासकीय व खाजगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.