गृहविलगीकरणात राहण्यासाठी आता ‘हमीपत्र’ आवश्यक! डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय स्राव चाचणी केल्यास दाखल होणार गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘आरटीपीसीआर’ चाचणी करुन परस्पर ‘गृहविलगीकरणात’ थांबणार्‍यांमुळे संगमनेरातील कोविडस्थिती बिघडली असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. याबाबत गेल्या शनिवारच्या (ता.27) अंकात दैनिक नायकने प्रशासनाचे लक्षही वेधले होते. त्याअनुषंगाने संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी रविवारी रात्री उशीराने प्रसिद्धपत्रक काढून डॉक्टरांच्या शिफारशी शिवाय कोणाचीही स्राव चाचणी करण्यास मनाई केली असून परस्पर स्राव चाचणी करणार्‍या व्यक्ति व प्रयोगशाळांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच स्राव दिल्यानंतर अहवाल येईस्तोवर व त्यानंतर गृहविलगीकरणात राहणारा रुग्ण त्याचे कुटुंब व समाजापासून अलगीकरणात राहील याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर व त्याच्या कुटुंबियांवर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी गृहविलगीकरणातील अनेक संशयीत रुग्ण समाजात वावरत असल्याने प्रादुर्भाव वाढल्याचे बोलले जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामागे असलेल्या विविध कारणांची मिमांसा सुरु असतांनाच स्राव दिल्यानंतर अहवाल प्राप्त होईस्तोवर संशयीत असलेले व लक्षणे नसतांनाही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले रुग्ण गृहविलगीकरणाच्या नावाखाली गावात फिरत असल्याचे निरीक्षण समोर आले, त्यातूनच दररोज रुग्णवाढीचा डोंगर उभा रहात असल्याचेही समोर आल्यानंतर राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनांनी गृहविलगीकरणावर नियमांची बंधने घातली आहेत. त्यासोबतच यापुढे डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय स्रावचाचणी करण्यासह मनाई करण्यात आली असून या नियमाचे उल्लंघन करणार्‍या रुग्णासह स्राव घेणार्‍या प्रयोगशाळेवरही कारवाई करण्याचा इशारा संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारा दिला आहे.

या आदेशान्वये गृहविलगीकरणातील रुग्णास वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली असून कोणत्याही खासगी डॉक्टरांनी कोविडबाबत संशय असलेल्या रुग्णाची स्राव चाचणीची शिफारस केल्यानंतर सदर संशयीताचा अहवाल प्राप्त होईस्तोवर त्याला गृहविलगीकरणातच थांबावे लागेल. यासाठी संबंधित डॉक्टरांसह संशयीत रुग्णाच्या कुटुंबियांना तसे हमीपत्र भरुन द्यावे लागणार आहे. स्रावचाचणीतून कोविडचे निदान झाल्यास संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या रुग्णाला कोठे उपचार घ्यावेत हे ठरवावे लागेल. 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व सहव्याधी अथवा अन्य गंभीर आजार नसलेल्या व्यक्तिंनाच वैद्यकीय तपासणीनंतर गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित डॉक्टरांसह त्याच्या कुटुंबियांना पुढील चौदा दिवस रुग्णाला वैद्यकीय निगराणीसह घरातच ठेवण्यासाठी हमीपत्र भरुन द्यावे लागेल.

या नियमानुसार तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तिच्या घरावर तसे स्टिकर चिकटवून त्याच्या हातावर विलगीकरणाचा ‘शिक्का’ मारणार आहेत. या कालावधीत संबंधित रुग्ण व त्याचे संपूर्ण कुटुंब घरातच वैद्यकीय निगराणीत राहतील. ज्या रुग्णांकडून याबाबतच्या नियमांचे उल्लंघन होईल त्यांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. यासंपूर्ण प्रक्रीयेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम सुरक्षा समिती व ग्राम पंचायतींचे लक्ष असणार आहे.

गृहविलगीकरणाच्या नावाखाली संगमनेरातील लक्षणे नसलेले अनेक रुग्ण गावात फिरत असल्याकडे दैनिक नायकने शनिवारच्या अंकातून प्रशासनाचे लक्ष्य वेधले होते. त्याचप्रमाणे संगमनेर नगरपालिकेकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याकडेही संगमनेरकरांना आकर्षित केले होते. त्याचा परिणाम पालिकेने रुग्णांचा संपर्क शोधण्यास सुरुवात केली असून प्रशासनाने गृहविलगीकरणासाठी नियमावली जाहीर करतांनाच डॉक्टर व कुटुंब अशा दोहींच्या हमीपत्राची अट घातली आहे.

Visits: 3 Today: 2 Total: 20971

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *