पठारभागात पिण्याच्या पाण्यासाठी सुरू झाली वणवण! दुचाकीला ड्रम बांधून आणताहेत पाणी; तर चौधरीवाडीचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव
नायक वृत्तसेवा, घारगाव
कायमच दुष्काळच्या झळा सोसणार्या संगमनेर तालुक्याचा पठारभागात कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई भासू लागली आहे. अनेक कुटुंबातील पुरुष आपल्या दुचाकीला अथवा सायकलीला पाण्याचे ड्रम बांधून एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पिण्याचे पाणी वाहून आणत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे. यामुळे लवकरच प्रशासनाला टँकर सुरू करावे लागणार असून, चौधरीवाडीचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल झाला आहे.
संगमनेर तालुक्याचा पसारा विस्तीर्ण आहे. त्यात पठारभाग हा डोंगरदर्यांमध्ये वसलेला आहे. येथे मोठ्या प्रमाणात गावांसह वाड्या-वस्त्या विखुरलेल्या आहेत. परंतु, मोठमोठे डोंगर आणि वनसंपदा असूनही पाण्याचे उद्भव नसल्याने कायमच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गेली दोन वर्षे सलग चांगला पाऊस होवूनही निचर्याची जमीन असल्याने पाणी वाहून जातेे. त्यातच परिसरात पाणीसाठे कमी प्रमाणात असल्याने पाणी साठले जात नाही. याचा परिणाम शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यावर दिसून येतो.
दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी कुटुंबियांना वणवण करावी लागते. आजही हे दृश्य कायम असून कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, वरवंडी, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी यांसह आदी वाड्या-वस्त्यांना बसू लागल्या आहेत. येथील कुटुंबातील कर्तबगार सदस्यांसह अबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तर तळेवाडी येथील अनेक पुरुष आपल्या दुचाकीला अथवा सायकलला ड्रम बांधून सुमारे एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी वाहून आणत आहे. त्याचबरोबर वरवंडी गावांतर्गत असलेल्या चौधरीवाडीला पिण्याच्या पाण्याची मोठी झळ बसू लागल्याने त्यांनी पंचायत समितीकडे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. वर्षानुवर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणार्या पठारभागाच्या टँकरमुक्तीचे स्वप्न कधी पूर्ण होईल, अशी भाबडी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी पठारभागातील अनेक ग्रामपंचायती टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या गडबडीत आहे. यामुळे पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामसेवक प्रस्ताव दाखल करण्यात येत असल्याचे दिसत आहे. तर अनेक वाडी-वस्त्यांचे प्रस्ताव दाखल होण्याची चिन्हे आहेत.