लसीकरणापासून कोणीही वंचित राहिल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारु! शिवसेनेचे ज्ञानेश्वर कांदळकर यांचा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे लोकसंख्येची योग्य ती आकडेवारी नसल्याने जर कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहिला. तर संगमनेर शिवसेना कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे पालक आहेत. जिल्हास्तरीय उपाययोजना तळागळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविणे त्यांचे कर्तव्य आहे. कोरोना काळात शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची प्रशासन काटेकोर अंमलबजावणी करत आहे. मात्र, त्याचप्रमाणे लसीकरण हा देखील अतिशय महत्वाचा भाग असल्याने तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. सद्यस्थितीत संगमनेरमध्ये कोणाला व्हेंटीलेटर बेड नाही, ऑक्सिजन बेड नाही तर रेमडेसिविर अतितातडीने हवे असल्यास मिळत नाही. त्यात दुर्देवं असं आहे की लोकसंख्येच्या 1 टक्केच्या आसपास लोक फक्त उपचार घेत आहे. यावरुन आरोग्य सुविधा अपुरी पडत असल्याने दररोज नागरिक मृत्यूला आपलेसे करत आहे ही शरमेची बाब आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारीत सर्व विभाग काम करत असल्याने नागरिकांची इत्यंभूत माहिती संकलित आहे. तरी देखील परिणामकारक उपाययोजना राबविण्यात प्रशासन कमी पडत आहे.

लसीकरणावर अधिक भर दिलेला असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रावर धाव घेताना दिसून येत आहे. त्यात फक्त 45 वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण सुरू आहे. तालुक्यात 10 आरोग्य केंद्र असताना नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. तेथेही आरोग्य यंत्रणा कमी पडल्याने किंवा योग्य प्रकारे नियोजन नसल्याने लोकांचा संयम तुटत असल्याचे चित्र दिसत आहे. येथे कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. यावरुन प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर येत आहे. मात्र, लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून योग्य नियोजन करुन घेऊन समाजातील शेवटच्या घटकाचे लसीकरण होण्यासाठी पावले उचलावीत. अन्यथा वंचित राहिल्यास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे जाब विचारू, आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख कांदळकर यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यात 10 आरोग्य केंद्र असून, 66 उपकेंद्र आहेत. तेथे योग्य प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच त्यांना लसीकरण करण्याची परवानगी द्यावी म्हणजे गर्दीचे नियोजन होईल. कारण प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन असून ते गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करतील. यातून आपोआप आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

Visits: 32 Today: 1 Total: 255831

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *