2022 पर्यंत निळवंडेचे कालव्यांद्वारे पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न ः थोरात सहकारमहर्षी थोरात कारखान्याची 53 वी ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
1999 मध्ये प्रथम राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपण निळवंडेच्या कामाला गती दिली. सातत्याने पाठपुरावा करून 2012 पर्यंत भिंतीचे काम पूर्ण केले. याच काळात बोगद्याची कामेही मार्गी लावली. मागील पाच वर्षे काम थांबले होते. आता पुन्हा महाविकास आघाडी सत्तेवर येताच दुसर्या दिवसापासून कालव्यांच्या कामाला गती दिली. चालू अर्थसंकल्पात भरीव निधी मंजूर केला असून, अजूनही निधी उपलब्ध करून देणार आहोत. 2022 पर्यंत दुष्काळी भागात कालव्यांद्वारे पाणी देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड.माधव कानवडे, महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शिवाजी थोरात, इंद्रजीत थोरात, अमित पंडित, शंकर खेमनर, उपाध्यक्ष संतोष हासे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, गणपत सांगळे, साहेबराव गडाख, संपत डोंगरे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, 5500 मेट्रिक टन क्षमतेच्या कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मितीचा हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा ठरला आहे. यावर्षी सर्वत्र ऊस जास्त प्रमाणात उपलब्ध असून कारखान्याने 10 लाख मेट्रिक टनाच्यापुढे गाळप केले आहे. विद्युत प्रकल्पातूनही कारखान्याला चांगले उत्पादन होत असून नव्याने सुरू केलेल्या इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पादनात भर पडणार आहे. कारखान्याची वाटचाल चांगली असून अधिक कार्यक्षमतेने काम करताना हा लौकिक यापुढेही असाच राहील. तसेच सभासदांनी हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन केले. तर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ म्हणाले, या वर्षी जास्तीत जास्त ऊस गाळप करून उच्चांकी विक्रम करण्याची संधी आहे. पूर्ण कार्यक्षमतेने काम करताना सभासदांना व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा देणार असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ.तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीरा वर्पे, मंदा वाघ, किरण कानवडे, शंकर धमक, नानासाहेब शिंदे, राजेंद्र गुंजाळ, केशव दिघे, राजेंद्र कढणे यांसह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या ऑनलाईन सभेत मोहन करंजकर, प्रभाकर कांदळकर, विलास वर्पे, रामनाथ कुर्हे, भास्कर शेरमाळे, मुरली खताळ आदिंनी ऑनलाईन सहभाग घेतला. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. डी.एस.भवर यांनी मागील सभेचे वृत्तांत वाचन केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर संतोष हासे यांनी आभार मानले.