संगमनेर महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे सुयश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात चालविल्या जाणार्या पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या सन 2021 या शैक्षणिक वर्षात नितीन मधुकर सूर्यवंशी यांनी 77 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. संजय नामदेव अहिरे यांनी 73 टक्के गुण मिळवून द्वितीय तर दत्ता शेणकर व सुयोग तुकाराम हांडे यांनी प्रत्येकी 72 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. श्यामसुंदर मार्तंड कुलकर्णी यांनी 71 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर मिलिंद रामचंद्र औटी व अर्चना रामदास साळुंके यांनी प्रत्येकी 70 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.

मागील नऊ वर्षांपासून प्रा. डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. नोकरी करून पत्रकारिता किंवा लेखन कौशल्य शिकू इच्छिणार्यांच्या सोयीसाठी दरवर्षी ऑक्टोबर ते मे महिन्यात प्रत्येक रविवारी संगमनेर महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. मुद्रित माध्यमांबरोबरच दूरचित्रवाणी, नभोवाणी तसेच शासनाच्या विविध विभागात, विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीच्या संधी या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध होऊ शकतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, अभ्यासक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते, प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी अभिनंदन केले आहे.
