राजहंस दूध संघाकडून उत्पादकांना मोफत चारा बियाणे चारा पिकासाठी 110 मेट्रिक टन बियाण्याचे होणार वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे दुधाच्या दरात घसरण होऊन दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकर्यांना अडचणीच्या काळात आधार मिळावा; यासाठी जनावरांना चारा पिकासाठी 110 मेट्रिक टन मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ ‘महानंद’चे व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.
याविषयी अधिक बोलताना देशमुख म्हणाले, जगभरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा सर्वच उद्योगधंद्यांना व दुग्ध व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल, मंदिर, महाविद्यालय, शाळा व इतर सर्व व्यवसाय तसेच लग्न कार्यक्रम बंद असल्यामुळे दुधाची मागणी कमी झाली आहे. त्याचा तोटा दूध संघ व दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. दूध उत्पादक हा दूध संघाचा पाया असून मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना मदत व्हावी म्हणून राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चारा बियाणांची मागणी केली होती. त्यापैकी 110 मेट्रिक टन बियाणे प्राप्त झाले असून येत्या चार-पाच दिवसांत मका, ज्वारी, बाजरी, गवत या चारा पिकांचे बियाणे स्थानिक दूध संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्यांना मोफत दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर दूध उत्पादकांना दूध उत्पादनावरील खर्च कमी व्हावा व उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च प्रतीचे राजहंस पशुखाद्य, मिनरल मिक्चर, कॅल्शियम उत्पादकांसाठी अनुदानित तत्वावर उपलब्ध केले असल्याचेही अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. महागाईचा भडका उडालेला असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. अशा प्रसंगी राजहंस दूध संघ शेतकर्यांच्या पाठिशी मदतीसाठी खंबीरपणे उभा राहत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व राजहंस दूध संघाच्या माध्यमातून उच्च प्रतीचे मका, ज्वारी व विविध प्रकारचे गवत असे एकूण 110 मेट्रिक टन बियाणे दूध उत्पादक शेतकर्यांना मोफत दिले जाणार आहे.
– रणजीतसिंह देशमुख (अध्यक्ष, महानंद व राजहंस दूध संघ संगमनेर)