संगमनेर शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या एकजण पळून जाण्यात यशस्वी; दरोड्याच्या साहित्यासह दोन दुचाकी जप्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारी (ता.11) मध्यरात्रीनंतर गस्तीवर असताना संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पुणे-नाशिक महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना अडवून लूटमार करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दरोड्याचे साहित्य मिरची पूड, गलोल, दोन दुचाकी, लाकडी दांडा, करवत, दगडं, लोखंडी कटावणी, लोखंडी वाकस, दोरी, चार मोबाईल असा ऐवज जप्त करुन चौघांना ताब्यात घेतले आहे तर एकजण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून कौतुक होऊन रात्रीची गस्त चालूच ठेवून गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचा सूर धरला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पथकासह रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना गुप्त खबर्‍यामार्फत पुणे-नाशिक महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन पाच इमस दुचाकी उभ्या करुन प्रवाशांना अडवून लूटमार करत आहे. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पथकाला घटनास्थळी पाठवले. तेथे पोलिसांचे पथक आल्याची चाहूल लागताच पळून जात असताना चौघांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी पकडलेल्या चौघांची झडती घेतली असता आरोपी जालिंदर मच्छिंद्र बर्डे (वय 30, रा.गुहा, ता.राहुरी) याच्या पाठीवरील बॅगेत मोबाईल, धार असलेली लोखंडी वाकस, लाकडी दांडा, लोखंडी कटावणी, करवत व दगडं मिळाली. दुसरा आरोपी गणेश उर्फ अजय मच्छिंद्र गायकवाड (वय 23, रा.गुहा, ता.राहुरी) याच्या खिशात मिरची पूड व मोबाईल मिळाला. लखन अर्जुन पिंपळे (वय 30, रा.दोडरवीर, ता.सिन्नर) याच्या खिशात मोबाईल, दोरी व गलोल मिळाली तर चौथा आरोपी सोमनाथ अर्जुन पवार (वय 21, रा.बाजारवाकडी, ता.नगर) मोबाईल, मिरची पूड व गलोल मिळाली. तसेच दोन दुचाकी डिस्कव्हर (क्र.एमएच.17, एडी.7354) आणि (एमएच.12, सीडब्ल्यू.4292) जप्त करण्यात आल्या आहेत. पळून गेलेल्या आरोपीचे नाव अशोक हरिभाऊ बनवटे (रा.श्रीरामपूर, मूळ-कोतूळ, ता.अकोले) असल्याचे सांगितले.

या प्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.86/2021 भादंवि कलम 399, 402 नुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर करुन पेालीस कोठडी घेतली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, मुख्य हवालदार अमित महाजन, पोलीस नाईक विजय पवार, विजय खाडे, पोलीस शिपाई अविनाश बर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे, सचिन उगले व सुरेश मोरे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहेत. या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत असून यापुढेही रात्रीची गस्त चालूच ठेऊन गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचा सूर उमटत आहे.

Visits: 25 Today: 2 Total: 115006

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *