राजकारणात सार्वजनिक कामांपेक्षा व्यक्तिगत कामांचेच महत्त्व वाढले ः विखे रामपूर येथे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह नूतन सदस्यांचा सत्कार
नायक वृत्तसेवा, राहुरी
केवळ राजकारण करण्यासाठी लोकांना प्रलोभने दाखविण्याची सवय लावल्यामुळे सार्वजनिक कामांचे महत्त्व कमी होवून व्यक्तिगत कामांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे समाज परावलंबी होवू लागला आहे. यातून रोजगाराचे असंख्य प्रश्न निर्माण झाले असल्याची खंत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.
राहुरी तालुक्यातील रामपूर येथे जिल्हा सहकारी बँकेवर निवडून आल्याबद्दल माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच ग्रामपंचायतींच्या नूतन सदस्यांचा विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, दीपक शिरसाठ, भाऊसाहेब कडू, राजेंद्र साबळे, राहुल साबळे, सर्जेराव खर्डे, शिवाजी घोलप, मच्छिंद्र अंत्रे, सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बाळासाहेब साबळे व राजेंद्र भोसले उपस्थित होते.
पुढे बोलताना विखे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण तेवढ्यापुरतेच ठेवावे. गावात कटूता न ठेवता, विकासकामांत गावकर्यांनी सहभागी व्हावे. यापूर्वी जाहीरनाम्यावर निवडणुका होत, दुर्दैवाने आता तशी परिस्थिती राहिली नाही. सोशल मीडियामुळे लोकांमधील नकारात्मक भूमिका कमी होण्यास मदत झाली. रावसाहेब साबळे म्हणाले, माझ्या 50 वर्षांच्या राजकीय जीवनात मी ग्रामपंचायतींची अशी निवडणूक कधीच पहिली नाही. पैसेवाले निवडणुकीत उतरले, त्यांनी निवडणुकीत पैशांची उधळपट्टी केली व धिंगाणा घातला, तरी गावकर्यांनी आमच्या कामावर विश्वास ठेवला. सूत्रसंचालन अनिल लोखंडे यांनी करुन आभार मानले.