काँग्रेसच्या संगमनेर शहराध्यक्षांचे आरोप पोरकटपणाचे! जावेद जहागिरदार यांचा घणाघात; तीस वर्षांच्या भ्रष्ट सत्तेला जनता वैतागली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील चार दशकांपासून संगमनेर तालुक्यात काँग्रेसची सत्ता आहे. तीस वर्षांपासून डॉ.सुधीर तांबे व दुर्गा तांबे यांच्याकडे नगरपालिका आहे. मात्र इतकी प्रदीर्घ सत्ता उपभोगूनही काँग्रेसला कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण झाले नाही. आज भाजपने शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करताच काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी पन्नास लाखांची तरतूद केल्याची खोटी माहिती देत पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारच्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट तरतूदी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात होत असतात. शहराध्यक्षांनी एकदा त्याची माहिती घ्यावी आणि नंतरच ठोस आरोप करावेत किंवा आपले अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याकडे शिकवणीसाठी यावे असा उपरोधीक टोला लगावतांना काँग्रेसच्या भ्रष्ट सत्तेला संगमनेरकर वैतागले असून यावर्षी परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास भाजपाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी व्यक्त केला.

संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावरुन सध्या भाजपा आणि सत्ताधारी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. गेल्या मंगळवारी भाजपाने याबाबत दैनिक नायकमध्ये आपली भूमिका मांडतांना या विषयावर भाष्य केले होते. त्यात भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले आणि शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी आगामी पालिका निवडणुकीत संगमनेरकर भाजपासोबत असून काँग्रेसची भ्रष्ट राजवट उलथवून भाजपाचे सुशासन येणार असल्याचे भाकीत करताना शहरात एक एकरच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासह देखणे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्याला उत्तर देताना गुरुवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी भूलथापा मारुन जनतेची दिशाभूल करण्यात भाजपा पटाईत असून नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी यापूर्वीच शिवस्मारकासाठी योग्य जागा आणि 50 लाखांची आर्थिक तरतूद केल्याचा पलटवार केला होता.

सोमेश्वर दिवटे यांनी गुरुवारी केलेल्या सर्व आरोपाना भाजपाच्या जावेद जहागिरदार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या चार दशकांपासून संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांची तर तीस वर्षांपासून विधान परिषदेचे विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे व त्यांच्या पत्नी दुर्गा तांबे यांची संगमनेर नगरपालिकेवर एकहाती सत्ता आहे. इतकी वर्ष काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ आपल्या राजकारणासाठी केला. आज भाजपाने प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा हा विषय उपस्थित केल्यानंतर त्यांना पालिकेने तरतूद केल्याची आठवण झाली का? असा सवाल उपस्थित करीत आता शहरातील नागरीकांचा भाजपावरील विश्वास वाढत असल्याचे पाहून सत्ताधार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने जनतेला खोटी आणि बोगस माहिती देण्यास सुरुवात झाल्याचे जहागिरदार यांनी म्हंटले आहे.

दिवटे यांनी गुरुवारी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना नगरपालिका दरवर्षीच्या अर्थसंकल्पात अशाप्रकारची वेगवेगळी बोगस कामे दाखवून कोट्यावधी रुपयांची तरतूद करीत असते. अशाप्रकारची तरतूद कितीही करता येते, त्याला कोणतीही मर्यादा नसते असे जहागिरदार यांनी म्हंटले आहे. तीन दशकांच्या सत्ताकाळात काँग्रसेला शिवस्मारकासाठी जागा मिळाली नाही आणि आता भाजपाने हा विषय उपस्थित करताच जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जावू लागले यातून काँग्रेसचा बनाव स्पष्ट दिसत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. सत्ताधार्‍यांना केवळ निविदा प्रक्रियेतून मिळणार्‍या टक्केवारीची चिंता असून त्यासाठी कधी पेव्हर ब्लॉक बसवले जातात आणि काही दिवसांतच ते उखडून त्याजागी काँक्रीट केले जाते. त्याला काही महिने होताच पुन्हा कॉक्रीट उखडून डांबरीकरण केले जाते. एवढे करुनही पोटं भरली नाहीत तर तो रस्ताही उकरला जातो आणि भूमिगत गटारीच्या नावाखाली कमिशन लाटले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

गेल्या तीस वर्षात पालिकेच्यावतीने झालेल्या एकाही कामाला दर्जा नसून चार-चार दशके नेतृत्त्व करणार्‍यांना संगमनेरकरांना स्वच्छ पिण्याचे पाणीही देता आले नाही. मात्र अज्ञानी ठेकेदाराने बांधलेल्या कथित फिल्टर प्लँटच्या दुरुस्तीसाठी मात्र आजवर कोट्यवधी आणि नदीपात्रातील विहिरीसाठी तब्बल 65 लाख रुपये उधळण्यात आल्याचा आरोपही जहागिरदार यांनी केला आहे. राज्यात भाजपाची सत्ता असतांना गणपुले व जहागिरदार नगरसेवक झाले होते. मग त्यांना शिवस्मारकाचा प्रश्न का सोडवता आला नाही असा सवाल काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी उपस्थित केला होता. त्याचाही जहागिरदार यांनी जोरदार समाचार घेतला.


यावर भाष्य करताना जहागिरदार यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे पोरकटपणाचे आरोप करीत असून त्यांनी आपले अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याकडे शिकवणीसाठी येण्याचा उपरोधीक सल्लाही त्यांना दिला. राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कामकाजाच्या पद्धती भिन्न असतात व त्यासाठी स्वतंत्र नियम आणि कायदेही असतात असे जहागिरदार म्हणाले. पालिकेने प्रस्ताव पाठवल्यानंतर शासन तो मंजूर करते आणि नंतरच त्यासाठी निधी उपलब्ध होतो. पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे आणि सभागृहात बहुमतानेच विषय मंजूर होत असतात. नगराध्यक्ष स्वतः मीटिंगचा अजेंडा तयार करतात, हा अधिकार नगरसेवकांना नसल्याचे निदर्शनास आणून देत राज्यात भाजपाची सत्ता असतानाही दोन नगरसेवक असा प्रस्ताव कसा मंजूर करु शकतील असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जहागिरदारांमध्ये कर्तृत्व असते तर त्यांच्यावर वॉर्ड बदलण्याची आणि दोन-दोनवेळा पराभूत होण्याची वेळ आली नसती, असा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला होता. त्याला उत्तर देतांना जहागिरदार यांनी दोनवेळा अन्य वॉर्डातून निवडणूक लढविण्यामागे आपला वॉर्ड इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे कारण सांगितले. आपला वॉर्ड सोडून दुसर्‍या वॉर्डातून लढण्यासाठी हिंमत लागते असे सांगतांना नगरसेवक असताना आपण कामे केली की नाही याचे प्रमाणपत्र काँग्रेसकडून घेण्याची गरज नसल्याचे सांगत जनता याचा फैसला करील असे जहागिरदार म्हणाले. जीवनात यश-अपयश सगळ्यांच्या पदरी पडतं असते, कोणीही अमरपट्टा बांधून जन्माला आलेला नाही. त्यामुळे कोणी कोणासोबत गद्दारी केली हे जनता जाणून असल्याचेही त्यांनी सांगितले.

वास्तविक भाजपाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतची आपली संकल्पना मांडली होती. त्यावर काँग्रेसकडून त्यावरच उत्तर मिळणे अपेक्षित असताना शहराध्यक्षांनी तीस वर्षांचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा घणाघाती आरोपही जहागिरदार यांनी केला. संगमनेरकरांनी काँग्रेसची पत ओळखली असून आगामी निवडणुकीत जनता भाजपासोबत आहे. काँग्रेसच्या तीस वर्षांची भ्रष्ट सत्ता आता जनताच उलथवून लावणार असून संगमनेरात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करतांना भाजप अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्त्वाखाली सुशासनासह जनमनातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *