स्वातंत्र्यदिनी राहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांची रात्रभर शोध मोहीम दोन दुचाकी सोडून चोरटे पसार; ग्रामस्थांनीही रात्रभर पिंजून काढला परिसर

नायक वृत्तसेवा, राहुरी
स्वातंत्र्यदिनी (रविवार ता. 15) मध्यरात्री नगर-मनमाड महामार्गावर रस्तालूट करणार्या सात-आठ सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. राहुरी पोलीस ठाण्यातील 35 कर्मचारी व अधिकार्यांनी नांदगाव ते कोल्हार दरम्यानचा परिसर रात्रभर पिंजून काढला. गुहा येथे पोलिसांच्या वाहनाने चोरट्यांच्या दुचाकीला धक्का दिला. मात्र, दोन दुचाकी सोडून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

रविवारी रात्री सव्वादहा वाजता नगर-मनमाड महामार्गावर कृषी विद्यापीठानजीक सिमेन स्टेशनसमोर दुचाकीस्वार अशोक भाऊसाहेब गायकवाड (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांनी अडविले. एका चोरट्याने गायकवाड यांच्या गळ्याला धारदार सत्तूर लावला, तर दोघांनी त्यांच्या शर्ट व पँटच्या खिशातून रोख दहा हजार रुपये व पाच हजारांचा मोबाईल लंपास केला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी रात्रीच्या गस्तीपथकाला सावध केले. गुहा पाट येथील काही भाविक पिकअप वाहनातून पंढरपूरहून देवदर्शन करून घरी परतत होते. त्यांचे वाहन गुहा पाटावर आले असता, दोन दुचाकींवरील पाच चोरट्यांच्या टोळीने रात्री बारा वाजता अडविले. शस्त्रांचा धाक दाखवून भाविकांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसपासचे नागरिक मदतीला धावल्याने चोरट्यांनी पलायन केले.

दरम्यान, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंह रजपूत, उपनिरीक्षक नीरज बोकील, उपनिरीक्षक तुषार धाकराव, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ यांची पथके 35 पोलीस कर्मचार्यांसह सहा खासगी वाहने, दोन सरकारी वाहने व चार दुचाकींवरून नगर-मनमाड महामार्गावर उतरली. मध्यरात्री एक वाजता गुहा पाट ते गुहा दरम्यान उपनिरीक्षक धाकराव यांच्या पथकाने दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग केला. गुहाहून तांभेरे रस्त्याकडे वळालेल्या चोरांच्या एका दुचाकीला पोलिसांच्या वाहनाने धक्का देऊन पाडले. वाहनातून पोलीस खाली उतरेपर्यंत दोन्ही दुचाकी सोडून पाच चोरट्यांनी अंधारात धूम ठोकली. तेथे पोलिसांनी विनाक्रमांकाची व एक चोरीची, अशा दोन दुचाकी ताब्यात घेतल्या.

ग्रामस्थांनी पिंजून काढला परिसर…
गुहातील ग्रामस्थांसह पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र, चोरट्यांचा शोध लागला नाही. पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रात्री नगर-मनमाड महामार्गावर रस्तालुटीच्या घटना टळल्या.
