गावकीच्या लढाईत उमेदवारांच्या समर्थकांचे एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले! मालुंजाचे केंद्र बनले रणांगण; दोन गटांकडून एकमेकांविरोधात ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणूका अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या असतांना तालुक्यातील मालुंजे येथे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात एकमेकांविरोधात चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या रविवारपासून सुरु असलेल्या या धुसफूशीची परिणीती दोन गटांकडून परस्परांवर हल्ले करण्यात झाली असून त्यातून दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या जातींचा उल्लेख करुन शिवराळ भाषेचा प्रयोगही केल्याने दंगा व दुखापत करण्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रोसिटी) व विनयभंगासारख्या गंभीर कलमान्वये दोन्ही बाजूच्या 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मालुंजे ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांसाठी 19 उमेदवार रिंगणात असून सरपंचपदासाठी मात्र दोघात सरळ लढत होणार आहे. येत्या रविवारी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असून आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्यापूर्वीच हा धमाका झाल्याने मालुंजे येथील निवडणूक ‘संवेदनशील’ बनली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्या मालुंजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सुरु असतांना दोन गटांमध्ये धुमश्चक्री उडाल्याचे समोर आले आहे. यातील एका गटाने अनुसूचित जाती-जमातीच्या चक्क उमेदवारालाच गावातील मारुतीरायाच्या मंदिरासमोर बोलावून घेतले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसर्‍या गटातील उमेदवार प्रदीप भाऊसाहेब घुगे याने ‘तू *** जातीची उमेदवारी करतोस काय. *** तू गावात प्रचारासाठी कसा फिरतो हे बघतो. तुम्ही **** माजले आहेत’ असे जातीवाचक शिवराळ भाषेत बोलून त्याने शिवीगाळ करीत ‘तुझे तंगडेच तोडतो, माझ्यावर अनेक केसेस आहेत, मी तडीपारही भोगली आहे. माझे कोणीही वाकडे करु शकत नाही..’ असा दमही त्याने ‘त्या’ उमेदवाराला भरला.

हा सगळा प्रकार सुरु असतानाच सदरील उमेदवाराचा पुतण्या तेथे आला व त्याने सुरु असलेले वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता प्रदीप घुगे याच्यासह संदीप भाऊसाहेब घुगे, विजय बच्छु डोंगरे व दीपक सोमनाथ डोंगरे यांनी एकमेकांशी संगनमत करुन अनुसूूचित जातीच्या त्या उमेदवारासह त्याच्या पुतण्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व ‘**** तुम्हाला आज जीवेच मारतो’ अशी धमकीही भरली. यादरम्यान या चौघांनीही त्या दोघांनाही जमिनीवर पाडून त्यांच्या तोंडात दारुची बाटली ओतली. यात ‘त्या’ उमेदवाराच्या तोंडाला जखम होवून त्याचा एक दातही अर्धवट तुटल्याचे त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणी वरील चौघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 325, 323, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (आर), 3 (1) (एस) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यातील दुसरी घटना याच गावातील एका पन्नास वर्षीय महिलेच्या घरात घडल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार दुसर्‍या गटातील नऊ जणांनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून ‘तुम्ही आमच्या विरोधात प्रचार करता काय?’ असा सवाल उपस्थित करुन प्रकाश लिंबाजी खरात (उमेदवार) याने सदरील महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने खाली पाडले. भाऊसाहेब राजेंद्र खरात याने फिर्यादीची साडी ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व आमच्या विरोधात प्रचार केला तर तुम्हाला जीवे मारुन टाकू अशी धमकी भरीत ते दोघेही तेथून निघून गेले.

या घटनेनंतर काही वेळाने फिर्यादी महिला गावातील मारुतीरायाच्या मंदिराजवळ गेली असता वरील दोघांसह संतोष रामभाऊ नागरे, संजय दादा खरात, देवराम भाऊराया घुगे, कल्पेश ठकसेन आव्हाड, सोमनाथ कारभारी वाघ, गणेश भाऊराव डोंगरे व गणपत शिवाजी डोंगरे (सर्व रा. मालुंजे) या सर्वांनी ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारावरुन वाद निर्माण करुन फिर्यादीस शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन सुरुवातीला तालुका पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 143, 147, 149, 452, 354 (अ), 324, 323, 504, 506 सह मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 37 (1)(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यात घटनेच्या दुसर्‍या दिवशी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 (1) (आर) (एस) वाढवण्यात आले आहे.

राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या परस्परविरोधी गटांमध्ये ही धुमश्चक्री उडाली असून यात प्रकाश लिंबाजी खरात, प्रदीप भाऊसाहेब घुगे व संतोष भाऊराव नागरे या तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले असून अन्य आरोपी महिला उमेदवारांचे नातेवाईक आहेत. मालुंजे येथील ग्रामपंचायत सदस्यपदासाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात अनुसूचित महिला गटातून दीपाली संतोष खरात व सारीका राजेंद्र खरात, महिला मागास प्रवर्गातून मीराबाई धोंडीबा घुगे व सुनीता मुरलीधर घुगे, सर्वसाधारण मतदारसंघातून अनिल कारभारी आव्हाड, सोमनाथ भागवत काकड, दत्तात्रय नंदू खरात, दत्तु दादा खरात, प्रकाश लिंबाजी खरात, प्रदीप भाऊसाहेब घुगे व संतोष रामभाऊ नागरे, सर्वसाधारण महिला गटातून रवीना सोमनाथ खरात, चिमाबाई किसन गागणे, मीराबाई शिवाजी डोंगरे, सकूबाई ज्ञानदेव डोंगरे, सरुबाई नामदेव आव्हाड, शीतल रवीकिरण वाघ, इतर मागास प्रवर्गातून शेखर शिवाजी सोसे व सोमनाथ बबन सोसे आदिंचा समावेश आहे. सरपंचपदासाठी ताराबाई घुगे व सुवर्णा घुगे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

Visits: 120 Today: 4 Total: 1105819

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *