आंबीखालसा परिसर हायमॅक्स दिव्यांनी लखलखला
आंबीखालसा परिसर हायमॅक्स दिव्यांनी लखलखला
चौदाव्या वित्त आयोगातून बसविले पथदिवे; नागरिकांत आनंद
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या वाड्या-वस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून चौदा हायमॅक्स दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर दिव्यांनी लखलखला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे सुरू आहेत, अशी माहिती आंबीखालसा गावचे उपसरपंच सुरेश कान्होरे यांनी दिली आहे.
![]()
आंबीखालसा गावांतर्गत तांगडी, पानसवाडी, जोठेवाडी, माळवदवाडी, आंबीफाटा, आंबीखालसा गावठाण व प्रभाकरराव भोर विद्यालय या सर्व वाड्या-वस्त्या येत आहेत. यापूर्वी वरील ठिकाणी हायमॅक्स दिवे नव्हते. येथील नागरिकांनी हायमॅक्स दिवे बसविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीतून हे सर्व हायमॅक्स दिवे बसविण्यात आले आहेत. दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र लखलखाट झालेला दिसतो. याबाबत बोलताना उपसरपंच कान्होरे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांमुळे गावचा चेहरामोहरा बदलला आहे. तसेच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून पोटाचे आजार होवू नये म्हणून गावात आर ओ फिल्टर बसविण्यात आले आहे.

यामुळे एक रुपयामध्ये ग्रामस्थांना एक लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. तसेच तांगडीमध्येही आर ओ फिल्टर बसविण्यात आले असून लवकरच ते सुरू होणार आहे. त्याचबरोबर पानसवाडी येथे स्मशानभूमी बांधण्यात आली असून तांगडीला स्मशानभूमीचे काम सुरू आहे. आंबीखालसातही स्मशानभूमीवर पत्र्याचे शेड व पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या विविध विकास कामांमुळे आंबीखालसा गावासह वाड्या-वस्त्यांचा नक्कीच चेहरामोहरा बदलेल असा विश्वासही शेवटी त्यांनी व्यक्त केला. यासाठी सरपंच अरूणा भुजबळ, चेतन कहाणे, सद्गुरू मोबाईल शॉपीचे मालक राजेंद्र गाडेकर, तुकाराम कजबे, सिराज शेख, युसूफ तांबोळी, आंबी माळेगाव सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ कहाणे, सुरेश गाडेकर, ज्ञानेश्वर कहाणे, राहुल कान्होरे आदिंचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

