नांदूर खंदरमाळमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. सुनंदाताई गहिनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात हा बिबट्या बुधवारी (ता.13) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दिसला. बिबट्याला पाहून वसतिगृहातील मुली चांगल्याच घाबरल्या होत्या.

नांदूर खंदरमाळ परिसरात गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. मेंढ्या, कालवडीसह इतर पाळीव प्राणीही ठार केले होते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरल्याने त्यांच्या मागणीवरून वन विभागाने पिंजरा लावला होता. परंतु, बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला नाही. त्यानंतर बिबट्या दिसला नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी सुनंदाताई गहिनाजी भागवत मुलींचे वसतिगृहात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. अचानक बिबट्याला पाहून वसतिगृहातील मुलींची अक्षरशः भंबेरी उडाली. आरडाओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी वसतिगृहाकडे धाव घेतल्याने बिबट्याने धूम ठोकली.

