कोपरगाव तालुक्यातील कुक्कुटपालक आर्थिक संकटात! बर्ड फ्ल्यूच्या भीतीने अंडी, चिकन मागणीत घट झाल्याचा परिणाम
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील 323 कुक्कुटपालकांकडे 14 लाख 44 हजार कोंबड्या आहेत. मात्र बर्ड फ्ल्यूच्या भीतीने अंडी, चिकन मागणीत कलालीची घट झाली आहे. दुसरीकडे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी बँकेचे घेतलेले कर्ज, रोजच्या खर्चाचा कसा मेळ घालायचा या विवंचनेतून येथील कुक्कुटपालन आर्थिक संकटात सापडले आहेत. कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक पोल्ट्री फार्म रांजणगाव देशमुख परिसरात आहेत.
पाथर्डीतील कोंबड्यांच्या संशयास्पद मृत्यूने कुक्कुटपालक धास्तावले आहेत. आकाशात उडणार्या पक्ष्यांच्या विष्ठेतून ‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग होत असल्याने त्यांच्यापासून पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना धोका होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना पशु संवर्धन विभागाने केली आहे. तालुका लघु पशुचिकित्सालयाचे सहाय्यक पशु संवर्धन आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.दिलीप दहे, पशुधन अधिकारी श्रद्धा काटे यांनी स्वतंत्र पाच पशु वैद्यकीय पथके तयार केली आहेत. त्यात पशुधन अधिकारी, दोन पर्यवेक्षक अधिकारी व सहाय्यकांचा समावेश आहे. तालुक्यात पक्ष्यांचा मृत्यू आढळल्यास त्याची तपासणी व वैद्यकीय अहवाल तयार केला जाणार आहे.
बर्ड फ्ल्यूचे संकट येण्यापूर्वीच पशु संवर्धन यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती डॉ.दिलीप दहे यांनी दिली आहे. सध्या तालुक्यातील एकाही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू या संसर्गजन्य आजाराने झालेला नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून पोल्ट्री फार्मजवळील मोठ्या वृक्षांच्या फांद्या काढाव्यात, बाहेर उडणारे, फिरणारे पक्षी पोल्ट्रीजवळ येऊ देऊ नयेत, अशा सूचना पशु संवर्धन विभागाने केल्या आहेत.
पोल्ट्री फार्मची सद्यस्थिती
एकूण पोल्ट्री फार्म – 323
एकूण पक्षी – 14 लाख 44 हजार
अंडी देणारे -4 लाख
मांसासाठीचे – 10 लाख
गावरान कोंबड्या – 6800