सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जाहीर संजय आवटे, रणजीतसिंह डिसले व अॅड.माधवराव कानवडे यांचा होणार सन्मान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारातील दीपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा पुरस्कार देऊन बुधवार दि. 13 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता गौरव करण्यात येणार आहे.
यामध्ये सहकार, समाजसेवा, पर्यावरण, पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्या व्यक्तिंसाठीच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत व संपादक संजय आवटे यांना गौरविण्यात येणार आहे. तर कृषी, शिक्षण, साहित्य व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्या व्यक्तिंसाठीचा डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले यांना देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच आदर्श सहकार व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा थोरात कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड.माधवराव कानवडे यांना देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक आमदार डॉ.सुधीर तांबे व ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांनी यशोधन संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जयंती महोत्सवानमित्त या पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता.13) मालपाणी लॉन्स येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे उपस्थितीत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पुरस्कारांची निवड उल्हास लाटकर, प्रा.बाबा खरात, प्राचार्य केशव जाधव, विजय बोर्हाडे, उत्कर्षा रुपवते, डॉ.राजीव शिंदे यांनी केली आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ.आण्णसाहेब शिंदे जयंती समितीच्यावतीने व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.