पैसा म्हणजे व्यवसायाचे रक्तच, ते नेहमी सळसळत असावे ः साळगावकर कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी उलगडला कालनिर्णयचा इतिहास


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण आपल्या व्यवसायातील पैसा व्यवसायातच कसा वापरतो यावरच त्या व्यवसायाचं गणितं अवलंबून असतं. पैसा म्हणजे व्यवसायाचे रक्त असतं आणि ते सतत सळसळत ठेवलं तर आपल्या व्यवसायाची भरभराट शक्य होते. मात्र एका व्यवसायातील दुसरा व्यवसायाकडे वळवताना आपल्याकडे योग्य दिशा आणि त्यासाठीची चौकट असणे आवश्यक आहे. असे नसेल तर आपला निर्णय फसू शकतो आणि त्यातून आपल्या मूळ व्यवसायाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते असे प्रतिपादन कालनिर्णयकार जयेंद्र साळगावकर यांनी केले.

मंगळवारी कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते ‘कालनिर्णयाची 50 वर्षे, ज्योतिषशास्त्र आणि मी’ या विषयावर बोलत होते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर मर्चंटस् बँकेचे अध्यक्ष ओंकार सोमाणी होते. यावेळी मंचावर कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, अ‍ॅड. प्रदीप मालपाणी व स्मिता गुणे उपस्थित होते.

कालनिर्णय प्रकाशनचा गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास उलगडताना साळगावकर पुढे म्हणाले की, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना वडील जयंत साळगावकर यांनी एका भाजी व्यापार्‍याकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेवून 1973 साली मुंबईतून कालनिर्णय प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षाचा आणि परिश्रमाचा असतांना त्यावेळी बाहेरुन कालनिर्णय छापून घेतला जात असे. त्यावेळी कालनिर्णयाचा खपही 4 ते 5 लाख प्रतिंच्या आसपास होता. सुरुवातीला केवळ मराठी भाषेत प्रकशन होत असतांना लोकांकडून अन्य भाषांचाही आग्रह वाढू लागल्याने कालांतराने हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी भाषांमधूनही कालनिर्णय छापले जावू लागले. तत्कालीन उद्योगमंत्री बाबूजी दर्डा यांनी कालनिर्णयसाठी आम्हाला जागा उपलब्ध करुन दिली. त्या जागेत आम्ही स्वतःचे छपाईयंत्र आणले, मात्र वीजेचा जोड नसल्याने बाजूच्या कारखान्याकडून तात्पूरती वीज घ्यावी लागत. त्यासाठी रात्रीच्या वेळी कालनिर्णय छापावा लागत असतं आणि दिवसभर आम्ही कालनिर्णयाची बांधणी करण्याचे काम करीत असल्याचा अनुभव यावेळी त्यांनी सांगितला.

गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत कालनिर्णयच्या सात भाषेतील चार आवृत्या प्रसिद्ध होतात. मराठीतील बहुतेक शास्त्रात सारखेपणा असतो, मात्र कन्नडचे शास्त्र वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे त्यांच्या ऋषीमुनी, यात्रा-जत्रा यांचा सखोल अभ्यास करुन त्याप्रमाणे त्याची छपाई करावी लागत असल्याचेही साळगावकर म्हणाले. मराठीच्या कोकण, कोल्हापूर येथील आवृत्तीत कालनिर्णयला भरपूर शास्त्र समावीष्ट करावे लागते. कालनिर्णयने कधीही ऐकीव माहितीचा ऊहापोह केला नाही, कालनिर्णयमध्ये छापली जाणारी प्रत्येक गोष्ट विश्वासाच्या कसोटीवर तासूनच घेतली जाते. जत्रा-यात्रा व सणवार याबाबतही पूर्ण खातरजमा करण्याची पद्धत कालनिर्णयने सुरुवातीपासून जोपाल्याचे साळगावकरांनी यावेळी बोलतांना सांगितले.

ज्योतिषशास्त्र समाजाचे आणि मनुष्य प्रवृत्तीचे ज्ञान वाढविण्याकरीता फार उपयोगी आहे. हे शास्त्र एकप्रकारची शक्ती आहे, त्याचा जसा फायदा होतो, तसा तोटाही होतो. आमच्या कार्यालयात अनेक वजनदार राजकीय नेत्यांचे फोन येतात व कुंडली बघण्याचा आग्रह केला जातो. प्रत्यक्षात मी कधीही कोणाचे भविष्य पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो नाही. गेल्या 20 वर्षांपासून आपण भविष्य पाहण्याचे काम बंद केले असून आज केवळ कालनिर्णयमध्ये छापून येणारे भविष्यच आपण लिहितो असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंकार सोमाणी यांनी गेल्या साडेचार दशकांपासून सुरु असलेल्या या व्याख्यानमालेचा उल्लेख करतांना कोरोना काळात जनजीवन ठप्प असतांनाही कवी अनंत फंदी प्रतिष्ठानने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करुन विचारांच्या यज्ञात खंड पडू दिला नसल्याचे सांगितले. आजच्या इंटरनेटच्या युगातही संगमनेरच्या पंचक्रोशीतील रसिकांची इतकी मोठी उपस्थिती संगमनेरच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी असल्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्मिता गुणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *