बंदी असलेला मांजा विकणाऱ्या दोघांवर संगमनेर पोलिसांची कारवाई! बेकायदा पद्धतीने मांजाची विक्री करणाऱ्यांं विरोधात कठोर कारवाई करणार : पो.नि. देशमुख

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पर्यावरणासह पशुपक्षी व मानवी जीवालाही धोका उत्पन्न करणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजा विरोधात पोलिसांनी एल्गार पुकारला असून मकर संक्रांतीला कोणत्याही स्थितीत बंदी असलेला मांजा वापरु देणार नसल्याचा निश्चय केला आहे. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी आज शहरातील दोन ठिकाणी छापेमारी करून सुमारे 26 हजार रुपयांचा बंदी असलेला मांंजा जप्त करुन एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी बंदी असलेला मांजा न वापरण्याचे आवाहन करताना अशा पद्धतीचा मांजा कोणी विकताना आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे, रोहिदास माळी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकासह शहरातील पतंग विक्रेत्यांकडे छापेमारी केली. यावेळी कुंभार आळा व मालदाड रोड या दोन भागातील पतंग विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात बंदी असलेला नायलॉन व चायनीज मांजा आढळून आला. तो संपूर्ण मांजा जप्त करण्यात आला आहे.

कुंभार आळा येथील रुकैया तांबोळी यांच्या कॉस्मेटिक दुकानावर पोलिसांनी छापा घातला असता त्यांच्या दुकानांमध्ये 20 हजार 400 रुपये किमतीचा 24 गट्टू मांजा, तसेच मालदाड रोड येथील अमोल मस्के याच्या दुकानावर छापा घातला असता तेथेही 5 हजार 300 रुपये किमतीचा बंदी असलेला मांंजा आढळून आला. याप्रकरणी रुकैया शमशुद्दीन तांबोळी (वय 60 वर्ष. रा. कुंभार आळा) व अमोल सुभाष म्हस्के (वय 31 वर्ष. रा. मालदार रोड) या दोघांविरोधात भा.द.वि. कलम 290, 291, 188 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून 25 हजार 700 रुपये किंंमतीचा नायलॉन व चायनीज मांजा जप्त केला आहे.

दरवर्षी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उडविल्या जाणाऱ्या पतंगासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यातून वातावरणात संचार करणाऱ्या पशू पक्ष्यांसह रस्त्यावरील पादचारी व दुचाकीस्वारांनाही त्यातून दुखापत झाल्याच्या हजारो घटना आहेत. दोनच दिवसांपूर्वी नाशिक शहरात दुचाकीवरून घरी निघालेल्या महिलेचा गळा नायलॉन मांजामुळे कापला गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मकरसंक्रांतीच्या पूर्वी संपूर्ण जिल्ह्यातून नायलॉन व चायनीज मांजा हद्दपार करावा असे सक्त आदेश सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने संगमनेरच्या पोलिसांनी आज शहरातील विविध भागात असलेल्या पतंग विक्रेत्यांकडे तपासणी करुन बंदी असलेल्या मांजाचा शोध घेतला. यावेळी दोन ठिकाणी हा मांंजा आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीतील सण व उत्सव आनंद साजरा करण्यासाठी आहेत. त्यातून निसर्गातील पशुपक्षी, झाडे-फुले व माणसांना कोणताही त्रास होणार नाही याचीही व्यवस्था केली गेली आहे. मात्र गेल्या काही वर्षात संस्कृतीचा ऱ्हास होऊन त्यात हुल्लडबाजी समाविष्ट झाल्याने माणसं पर्यावरण व मुक्या जीवांकडे दुर्लक्ष करून आनंद मिळवण्याकडे धावत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून पर्यावरणाची, पशुपक्ष्यांची व मानवाचीही हानी होत आहे. अशा प्रकारच्या मांंजाचा वापर बेकायदेशीर असतानाही पैशाच्या लालसेने काहीजण चोरून तो विकत असतात. अशा लोकांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकांनीही बंदी असलेला मांंजा वापरू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे. शहर पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पो.नि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक साबळे, माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पोलीस नाईक विजय पवार, विजय खाडे, पोलीस शिपाई सचिन उगले व महिला पोलीस कर्मचारी अनिता सरगैये आदींचा सहभाग होता.

