भविष्यातील दिशा ओळखून शेतकर्यांनी शेतीच्या चळवळीत सहभागी व्हावे ः शिंदे नेवासा येथे मोठ्या उत्साहात किसान दिन साजरा; विविध कृषी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, नेवासा
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषी विकास केंद्र दहिगावने व कृषी समर्पण अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नेवासा व झुआरी अॅग्रो केमिकल लि., गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नेवासा येथे राष्ट्रीय किसान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भविष्यातील दिशा ओळखून शेतकर्यांनी शेतीच्या चळवळीत सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री मारुतराव शिक्षण संस्थेचे सचिव काकासाहेब शिंदे यांनी यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना केले.
नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या प्रणाम सभागृहात राष्ट्रीय किसान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा ‘23 डिसेंबर’ हा दिवस ‘राष्ट्रीय किसान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शेतकर्यांना विविध कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पुढे बोलताना काकासाहेब शिंदे म्हणाले, आज शेती करताना रासायनिक खतांचा अधिक वापर होत असल्याचे दिसत आहे, त्यातच शेती ही चळवळ बनलेली असल्याने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विष मुक्त शेती करणे ही काळाची गरज झाली असल्याने त्यादृष्टीने शेतकर्यांनी शेती करताना प्रयत्न करावा असे आवाहन करून त्यांनी शेतीविषयक महत्वपूर्ण मुद्दे आपल्या व्याख्यानात बोलताना मांडले. तसेच रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनाबद्दल केव्हीकेचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एस.एस.कौशिक यांनीही शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
कांदा पीक उत्पादन व कांदा बीज उत्पादन या विषयावर केव्हीकेचे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे यांनी मार्गदर्शन केले. शेतकर्यांचे कल्याण होणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच शेतकर्यांची अडचणीच्या वेळी त्यांची सोय होणे महत्त्वाचे आहे असे मत कृषी समर्पण अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी बोलताना व्यक्त केले.
खत उत्पादनामध्ये अग्रणी असलेले झुआरी अॅग्रो केमिकल कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक अनुज सिंग तसेच कंपनीचे विपणन व्यवस्थापक प्रणव खामकर व अशोक शेवाळे यांनी उपस्थित शेतकर्यांना किसान दिनाच्या शुभेच्छा देऊन शेतकर्यांना पुढील येणार्या कार्यक्रमामध्ये शक्य तितके मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी उपस्थित राहून शेतकर्यांचे ऋण व्यक्त केले व त्यांना किसान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा शिवछत्रपती ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे, शास्त्रज्ञ राहुल पाटील, मोहन मारकळी, गोधेगाव येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष जाधव, अनिल घोलप, जानकीराम डौले, विठ्ठल देशमुख, दत्तात्रय वंजारी, कृषी समर्पण अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे सर्व संचालक, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले तर माणिक लाखे यांनी आभार मानले.