चार पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या तर तिघांना मुदतवाढ! तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नाशिक जिल्ह्यात तर एलसीबीच्या निरीक्षकांना मुदतवाढ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या कालावधीत विस्कळीत झालेल्या बदल्यांची प्रक्रीया ‘अखेर’ सुरु झाली असून राज्याच्या गृह विभागात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील चार वरीष्ठ पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली असून त्यांच्या जागी चौघे नव्याने जिल्ह्यात आले आहेत. त्यासोबतच दोघा सहाय्यक निरीक्षकांसह जिल्ह्यातील सेवेचा कार्यकाळ पूर्ण करणार्या पाच उपनिरीक्षकांच्याही अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याबाबतचे आदेश बजावले असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अभय परमार यांना सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेवून तर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व बाजीराव पोवार यांना 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षींपासून राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचार्यांच्या बदल्या खोळंबल्या होत्या. गेल्यावर्षी पहिली लाट ओसरत असल्याचे गृहीत धरुन शासनाने बदल्यांची प्रक्रिया सुरु केली होती, मात्र त्याचवेळी दुसर्या संक्रमणाला जोर चढल्याने बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण करणार्यांसह नियुक्तिच्या ठिकाणचा कार्यकाळही पूर्ण झालेल्या पोलीस अधिकार्यांना गेल्या मोठ्या कालावधीपासून बदली आदेशाची प्रतीक्षा होती. ती मंगळवारी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संपविली.
मंगळवारी प्राप्त झालेल्या आदेशान्वये सध्या तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नाशिक ग्रामीण विभागात बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव व नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांचीही बदली नाशिक ग्रामीण विभागात करण्यात आली आहे. कोतवालीत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना नंदूरबार जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय परमार अकोल्यातील पोलीस कर्मचार्याच्या लाचखोरीमुळे सध्या नियंत्रण कक्षात आहेत. त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळही पूर्ण झाला आहे. मात्र त्यांची सेवानिवृत्ती टप्प्यात असल्याने त्यांना जिल्ह्यातच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व दक्षिणेत आपला दरारा निर्माण करणार्या पो. नि. बाजीराव पोवार यांनाही 2022 च्या सार्वत्रिक बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातून चार वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाहेर गेल्याने त्यांच्या जागी जळगावहून पोलीस निरीक्षक भीमराज नंदुरकर, नंदूरबार येथून पो.नि.विजयसिंग राजपूत, नाशिक ग्रामीण विभागातून पो.नि.नरेंद्र भदाणे व गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. यासह जिल्ह्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची नाशिक ग्रामीणला तर त्यांच्या जागी जळगावहून सचिन जाधव आणि दिलीप राठोड यांची जळगावला, तर त्यांच्या जागी जळगावहून रवींद्र बागुल यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. याशिवाय माधव केदार, सूरज मेढे, रावसाहेब त्रिभुवन, प्रकाश गवळी व दिलीप बोडके या पाच पोलीस उपनिरीक्षकांच्याही जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल झाली. एकीकडे तालुक्यातील गुन्हेगारीचा स्तर वाढत असताना तालुका पोलिसांची ही कामगिरी कर्मचार्यांचे मनोबल वाढवणारी आणि जनमानसातील पोलिसांच्या प्रति असलेला विश्वास द्विगुणीत करणारी ठरली. आता पो. नि. पवार यांची बदली झाल्याने तालुका पोलीस ठाण्यात कोणाची वर्णी लागणार अशा चर्चा आहेत. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय परमार निवृत्तीच्या प्रतीक्षेत असल्याने व त्यांना संगमनेर तालुक्याचा चांगला अभ्यास असल्याने तालुक्याच्या निरीक्षकपदी त्यांचीच नियुक्तीव्हावी असाही सूर आता तालुक्यातून उमटू लागला आहे. पोलीस अधीक्षक परमार यांना पोलीस ठाणे देवून निवृत्तीपर्यंतचा प्रवास घडवतात की नियंत्रण कक्षातूनच हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.