अवघ्या चारच दिवसांत कोविडने घेतले तालुक्यातील तिघांचे बळी! जुलै आणि ऑगस्टमध्ये तालुक्यातील रुग्णसंख्येत तब्बल तेराशे रुग्णांची भर, पंधरा बळीही गेले!!
श्याम तिवारी, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच संक्रमणातून बळी जाणार्यांचीही संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील बाधितांची संख्या चौदाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली असून कोविडने आत्तापर्यंत 26 जणांचा बळी घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार दिवसांत तालुक्यातील चिंचोली गुरव, संगमनेर खुर्द व सोनुशी येथील तिघांचे बळी गेले असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती गंभीर वळणावर पोहोचली असून नागरिकांनी स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करण्याची अनिवार्यता निर्माण झाली आहे.
30 मार्चरोजी संगमनेर तालुक्यात कोविडच्या संक्रमणाला सुरुवात झाली. नायकवाडपूरा परिसरातील पंधरा संशयित रुग्णांच्या तपासणीतून 2 एप्रिलरोजी शहरातील तीन तर आश्वी बु. येथील एक रुग्ण समोर आला. तेव्हापासून संगमनेर तालुक्यात एकामागून एक रुग्ण समोर यायला सुरुवात झाली. अर्थात सुरुवातीच्या दोन महिन्यात रुग्णवाढीचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. लॉकडाऊनच्या काळात स्थानिक प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने जीव ओतून काम केल्याने एप्रिलमध्ये आठ, मे मध्ये 36 तर जूनमध्ये 65 असे तीन महिन्यात अवघे 109 रुग्ण समोर आले. मात्र लॉकडाऊन हटवून अनलॉकची सुरुवात होताच रुग्णवाढीसोबतच संगमनेरात कोविडचे बळी जाण्यासही सुरुवात झाली.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. येथील 68 वर्षीय इसमाच्या रुपाने 7 मे रोजी कोविडने पहिला बळी घेतला. त्यानंतर 19 मे रोजी निमोण येथील 54 वर्षीय इसम, 23 मे रोजी 57 वर्षीय इसम, 29 मे रोजी मदिनानगर येथील 55 वर्षीय इसमाच्या रुपाने शहरातील पहिला मृत्यु व 31 मे रोजी डिग्रस येथील 52 वर्षीय महिलेच्या रुपाने कोविडने एकाच महिन्यात पाच बळी घेतले. जूनमध्ये टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारने अनलॉक प्रक्रीया राबविण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील रुग्णसंख्येतही मोठी वाढ होवू लागली.
जूनमध्ये मागील दोन महिन्यांची रुग्णसंख्या मागे सारीत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 65 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जूनच्या शेवटच्या तारखेला तालुक्याने बाधितांचे शतक पूर्ण करीत 109 रुग्णसंख्या गाठली. त्यासोबतच 9 जूनरोजी शेडगावमधील 63 वर्षीय महिला, मोमीनपूरा येथील 63 वर्षीय तर नायकवाडपूरा येथील 65 वर्षीय महिलेच्या रुपाने एकाच दिवशी तीन महिलांचा बळी गेल्याने अवघा तालुका हादरला. मात्र कोविडने बळी जाणार्यांची संख्या काही थांबली नाही. त्यानंतरही 13 जूनरोजी मालदाडरोडवरील 72 वर्षीय महिला, 24 जूनरोजी राजवाडा परिसरातील 38 वर्षीय महिला व 26 जूनरोजी नायकवाडपूरा येथील 50 वर्षीय महिलेच्या रुपाने एकाच महिन्यात सहा महिलांचा मृत्यु झाला. त्यामुृळे या महिन्यातच तालुक्याने रुग्णांचे शतक ओलांडीत 109 ची संख्या गाठण्यासोबतच मृतांची संख्याही अकरावर जावून पोहोचली.
जुलैमध्ये अनलॉक प्रक्रीयेतून बहुतेक सर्वच उद्योग व व्यवसायांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची अपेक्षा गृहीत धरुन स्थानिक प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सज्ज केली. त्यानंतरच्या काळात अपेक्षेप्रमाणे घडलेही. 1 ते 31 जुलै या कालावधीत तालुक्याले मागील तिनही महिन्यांचे एकत्रित विक्रम खुप मागे टाकीत तालुक्याच्या रुग्णसंख्येत थोडी न् थिडकी तब्बल 650 रुग्णांची भर घातली. त्यामुळे सुरुवातीचे तीन महिने किरकोळ वाटणारी संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या एकाच महिन्यात 109 वरुन थेट 759 वर जावून पोहोचली.
त्यासोबतच या एकाच महिन्यात तब्बल आठ रुग्णांचे बळीही गेले. त्यात 7 जुलैरोजी सय्यदबाबा चौकातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, त्याच दिवशी कासारा दुमाला येथील 58 वर्षीय इसम, दुसर्या दिवशी 8 जुलै रोजी श्रमिकनगर येथील 57 वर्षीय इसम, 19 जुलै रोजी शिबलापूर येथील 43 वर्षीय तरुणासह कासारा दुमाला येथील 87 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 21 जुलैरोजी घुलेवाडीतील 59 वर्षीय इसम, 22 जुलैरोजी मोगलपूर्यातील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 25 जुलैरोजी कुरणमधील 45 वर्षीय तरुणाचा कोविडने बळी घेतला.
ऑगस्टमध्ये कोविडच्या संक्रमणात घट होईल असा काही जाणकारांचा अंदाज होता, मात्र तो सपशेल फोल ठरला. गेल्या 1 ऑगस्टपासून कालच्या सोमवारपर्यंत (ता.24) संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत 636 रुग्णांची भर पडली आहे. हा महिना संपण्यास अद्यापही सहा दिवस बाकी असल्याने या संख्येत आणखी भर पडणार हे निश्चित आहे. त्यासोबतच ऑगस्टमध्येही आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले असून 4 ऑगस्टरोजी निमोण येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 6 ऑगस्टरोजी मालदाड रोड परिसरातील 81 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ति, 9 ऑगस्टरोजी कर्हे येथील 55 वर्षीय इसम, 17 ऑगस्टरोजी कुंभारआळा येथील 65 वर्षीय इसम, 20 ऑगस्टरोजी चिंचोली गुरव येथील 94 वर्षीय वयोवृद्धासह संगमनेर खुर्द येथील 44 वर्षीय तरुण तर 21 ऑगस्टरोजी सोनुशी येथील 51 वर्षीय महिलेच्या रुपाने कोविडने तालुक्यातील 26 वा बळी घेतला. या महिन्यात रुग्णसंख्येत वाढ होण्यासोबतच आत्तापर्यंत सात जणांचा मृत्युही झाला आहे.
संगमनेर तालुक्यात 30 मार्चपासून कोविडचे संक्रमण सुरु झाले आणि 2 एप्रिलरोजी शहरातील तिघांसह आश्वी बु. येथील एकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून तालुक्यातील रुग्णसंख्या आणि संक्रमणातून बळी जाणार्यांची संख्याही चढत्याक्रमाने राहीली आहे. एप्रिलमध्ये तालुक्यात आठ रुग्ण समोर आले, मे मध्ये ही संख्या 36 वर पोहोचली व पाच जणांचे बळी गेले तर जूनमध्ये त्यात आणखी 65 रुग्णांची भर पडून त्यातील सहा रुग्णांचा बळी गेला. जुलैमध्ये कोविडची दाहकता अधिक वाढून तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल साडेसहाशे रुग्णांची भर पडण्यासोबतच आठ जणांचे बळी गेले. या महिन्यातही हिच श्रृंखला कायम असून या महिन्याने आत्तापर्यंत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 636 रुग्णांची भर घालण्यासोबतच सात जणांचे जीवही घेतले आहेत.