इंदूरच्या सोनी दाम्पत्याची नार्को टेस्ट करा ः लोकचंदानी बेपत्ता महिला सापडल्याने विविध चर्चांना उधाण
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथून इंदूरची महिला तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती; ती इंदूर येथेच आता सापडली आहे. मात्र ही महिला शिर्डीतून बेपत्ता झाली तेव्हा तिच्या पतीने या महिलेचे अपहरण झाल्याची मोठी चर्चा केली. शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये त्यासंदर्भात बेपत्ता झाल्याचा गुन्हाही दाखल झाला असला तरी हे प्रकरण खंडपीठापर्यंत गेले. त्यामुळे ते संपूर्ण राज्यात गाजले. परंतु, ही महिला इंदूरची व ती तीन वर्षांनी परत इंदूरमध्येच सापडली, ही महिला सध्या काही सांगत नाही असं तिचा पती मनोज सोनी म्हणतो. तर इंदूरची महिला इंदूरमध्ये सापडते, ती शिर्डीतून बेपत्ता झाली, तीन वर्षे गायब होती आणि आता परत इंदूरला सापडते या पाठीमागे काहीतरी गौडबंगाल आहे. यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत आहे, विनाकारण शिर्डीचे नाव बदनाम होत असून शिर्डीतून महिलांचे अपहरण होते याची चर्चा देश-विदेशात झाली. त्यामुळे शिर्डीचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला असून याला कारणीभूत मनोज सोनी व दीप्ती सोनी हेच आहेत. म्हणून याप्रकरणी खरं काय खोटं काय यासाठी या दोघांचीही नार्को टेस्ट करा त्यातून सत्य उजेडात येईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेश लोकचंदानी यांनी केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, इंदूर येथील सोनी परिवार 10 ऑगस्ट, 2017 रोजी शिर्डीला साई दर्शनासाठी आला होता. पती, पत्नी, लहान मुलगा व मुली समवेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर प्रसादासाठी भोजनालयात हे कुटुंब गेले असता त्यानंतर बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमयरित्या दीप्ती मनोज सोनी ही महीला बेपत्ता झाली होती. तसा शिर्डी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिर्डी पोलिसांनी विविध प्रकाराने तपास करुनही महिला मिळून आली नाही. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट असताना ती महिला इंदूर येथील नंदा नगर परिसरात तिच्या बहिणीला तीन वर्षानंतर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे ती तिचे खरंच अपहरण झाले होते का कधी स्वतःहून बेपत्ता झाली की कोणाबरोबर केली की नेमके काय झाले याची अजून कोणाला माहिती नाही. मात्र विनाकारण शिर्डीचे नाव बदनाम करण्याचा यातून प्रयत्न होत आहे.
याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी म्हणाले, दीप्ती सोनीला सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगून 17 तारखेला ती इंदूर येथील नंदा नगर परिसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे. ओळख वगैरे पटली आहे. तसेच ती इतकी वर्षे कोठे होती, तिला कोणी आधार दिला, ती इंदूर येथे कशी पोहोचली याची मी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने त्याचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाले आहेत याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. शिर्डी शहरात मानवी तस्करी होते याबाबत मोठा गाजावाजा झाला होता. शिर्डीतून महिलांचे अपहरण होते अशीही मोठी चर्चा राज्यात झाली होती. त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम झाले होते. याचा आर्थिक उलाढालीवर थेट फटका बसला होता.
आता दीप्ती सोनी ही महिला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणावे. त्याचप्रमाणे दीप्ती सोनी व तिचा पती मनोज सोनी या दोघांची नार्को टेस्ट करावी. कारण कोण खरे बोलतं आणि कोण खोटं बोलतं हे संपूर्ण नागरिकांना, साईभक्तांना कळेल. तसेच ही महिला बेपत्ता होते त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या इंदूर शहरामध्ये सापडत या पाठीमागे कोण आहे याचाही शोध घेणे गरजेचे आहे. विनाकारण शिर्डीचे नाव महिलांचे अपहरण होते म्हणून बदनाम केल्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते जितेश लोकचंदानी यांनी केली आहे.