संगमनेर तालुक्यात आज आढळले तेहतीस रुग्ण! बाधितांमध्ये शहरातील नऊ जणांसह तालुक्यातील दोघा शिक्षकांचाही समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ओहोटीच्या दिशेने सरकत असलेल्या कोविड प्रादुर्भावातील चढ-उतार कधी दिलासा तर, कधी धक्का देत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांतील आकडेवारीतून दिसत आहे. 9 डिसेंबरनंतर सुरु झालेली रुग्णगतीतील घसरण अपवात्मक दिवस वगळता कायम असली तरीही अधुनमधून मोठ्या रुग्णसंख्येचे धक्के चिंता वाढवणारे ठरत आहेत. आजही 33 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले असून त्यात शहरातील नऊजणांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून आणखी दोघा शिक्षकांनाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची रुग्णसंख्या सहा हजारांच्या दिशेने पुढे सरकत 5 हजार 770 वर पोहोचली आहे.


डिसेंबरच्या पहिल्या आठ दिवसांत सरासरी 36 रुग्णांची गती ठेवणार्‍या कोविडने चालू महिन्यात रुग्णसंख्या फुगणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र 8 डिसेंबरनंतर त्यात घसरण व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम दररोजच्या सरासरीत झाल्याने फुगत चाललेल्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात आळा बसला. मात्र गेल्या दहा दिवसांमध्ये अधुनमधून तीसपेक्षा अधिक रुग्ण समोर येण्याचे धक्केही बसले. अर्थात 9 ते 19 डिसेंबर या कालावधीत 30 अथवा 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळण्याच्या केवळ चार घटना आहेत. या महिन्याच्या सुरुवातीच्या आठ दिवसांचा विचार करता अशा घटना तब्बल आठ पैकी सलग सात दिवस घडल्या आहेत हे विशेष. त्यातही चारवेळा चाळीसहून अधिक रुग्ण समोर आले होते.


आज रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 23, शासकीय प्रयोगशाळेद्वारा चार व खासगी प्रयोगशाळेद्वारा सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यातून शहरातील नऊ तर ग्रामीण भागातील 24 जणांना कोविडची लागण झाली, आजच्या अहवालात दोघा शिक्षकांचाही समावेश आहे. आज शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये कोष्टी गल्लीतील 59 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावतामाळी नगरमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, देवीगल्लीतील 60 वर्षीय महिला, चैतन्य नगरमधील 42 वर्षीय तरुण,जनता नगरमधील 32 व 30 वर्षीय तरुण आणि मालदाड रोडवरील 50 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय मुलगा बाधित झाले आहेत.


ग्रामीणभागातील शेडगावमधील 50 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 55 वर्षीय महिला, चंदनापूरी येथील 65 वर्षीय महिलेसह 40 व 36 वर्षीय तरुण व 11 वर्षीय मुलगा, पिंपळगाव देपा येथील 58 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 29 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 79 वर्षीय वयोवृद्धासह 24 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 57 वर्षीय इसमासह 13 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, मालदाड येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, घुलेवाडीतील 52 व 42 वर्षीय महिला व शिवारातील साईश्रद्धा चौकातील 9 वर्षीय बालिका, निमगाव टेंभी येथील 44 वर्षीय महिला, राजापूर येथील 30 वर्षीय तरुण, वडगावपान येथील 40 वर्षीय तरुण व तळेगाव दिघे येथील 51 वर्षीय इसम अशा एकूण 33 जणांचे अहवाल अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडून ती आता 5 हजार 770 वर पोहोचली आहे.

Visits: 7 Today: 2 Total: 26583

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *