संगमनेरचा पठारभाग नुकसान भरपाईपासून वंचित संतप्त नुकसानग्रस्त शेतकरी घेणार जिल्हाधिकार्‍यांची भेट

नायक वृत्तसेवा, घारगाव
यावर्षी निसर्गाने शेतकर्‍यांना पुरते हतबल करुन टाकले आहे. हातातोंडाशी आलेला घासही ढगफुटीसदृश्य पावसाने हिरावून नेल्याने शेतकर्‍यांची मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नुकसानग्रस्त भागात जावून पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता तुम्ही निकषांमध्ये बसत नसल्याचे तहसीलदार सांगत असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच ते जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे समजते.

संगमनेर तालुक्याचा पठार भाग म्हंटला की, नेहमीच पाचवीला पुजलेला दुष्काळ होय. त्यात निसर्गाच्या लहरीपणावर मात करत शेती पिकवावी लागते. परंतु, अशा संकटाशी सामना करताना निसर्ग चक्री वादळाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर शेतकर्‍यांनी थोडेफार सावरत पुन्हा पिके घेतली. ही पिकेही हातातोंडाशी आली आसतानाच पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली अन् ढगफुटीसदृश्य पावसाने शेतात असणार्‍या पिकांचे होत्याचे नव्हते झाले. पुन्हा शेतकर्‍यांनी कर्ज काढून बियाणे घेतली. परंतु तेही शेतात पावसाचे पाणी साचल्याने वाया गेले. त्यानंतर नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मी शेतकरी पुत्र असल्याचा व मला शेतकर्‍यांची जास्त काळजी आहे असे म्हणत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, नांदूर खंदरमाळ येथील नुकसानग्रस्त भागाला भेटी देत शेतकर्‍यांशी संवादही साधला. त्यावेळी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासनही दिले. आता या गोष्टीला बर्‍याच दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी चांगेलच संतप्त झाले आहे आहेत.

मदतीच्या चौकशीसाठी आंबीखालसा येथील शेतकरी तुळशीनाथ भोर यांनी तहसीलदार अमोल निकम यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यावेळी ते म्हणाले की तुमचा भाग निकषांमध्ये बसत नाही. त्यामुळे आता शेतकरी चांगेलच संतप्त झाले आहेत. आम्हा शेतकर्‍यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसण्याचेच काम शासनाने केले आहे असेही शेतकरी म्हणत आहे. यावरुन शेतकर्‍यांची ‘न घरका न घाटका’ अशी दयनीय अवस्था झाली असून, लवकरच शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहे.

ढगफुटीसदृश्य पावसाने संपूर्ण पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्वतः नांदूर खंदरमाळ येथे येवून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकर्‍यांशी संवाद साधला. तुम्हांला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासनही दिले. मात्र आता तहसीलदार सांगतात की, तुम्ही निकषांमध्ये बसत नाही त्यामुळे नेमके कुठले निकष आहेत?
– गणेश सुपेकर (माजी उपसरपंच, नांदूर खंदरमाळ)

Visits: 10 Today: 1 Total: 115089

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *