डॉ.बाळासाहेब विखेंच्या जुन्या पुस्तकाची नव्याने होतेय चर्चा…!
डॉ.बाळासाहेब विखेंच्या जुन्या पुस्तकाची नव्याने होतेय चर्चा…!
प्रकाशनाचे टायमिंग साधल्याची चर्चा; निवडक पुस्तकांच्या यादीतही समावेश
नायक वृत्तसेवा, राहाता
ज्येष्ठ नेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ज्या आत्मचरित्राची सध्या चर्चा सुरू आहे, ते चार वर्षांपूर्वीच बाजारात आले होते. तेव्हा स्वत: विखे हयात होते. त्यानंतर काही काळात त्यांचे निधन झाले होते. आता त्याच पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आणि त्यावर चर्चाही सुरू झाली आहे.
‘देह वेचावा कारणी’ या डॉ.विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी मोदींच्या हस्ते थाटात करण्यात आले. राजहंस प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र, ऑक्टोबर 2016 मध्येच हे पुस्तक बाजारात आले होते. त्याच्या काही प्रती आजही अनेकांकडे उपलब्ध आहेत. फारसा गाजावाजा न करता हे पुस्तक तेव्हा प्रकाशित करण्यात आले होते. त्या काळात विखे आजारी होते. त्यांच्यावर दीर्घकाळ रुग्णालयामध्ये आणि नंतर घरीच उपचार करण्यात येत होते. डिसेंबर 2016 मध्ये त्यांचे निधन झाले. 2016 मधील निवडक पुस्तकांच्या यादीत अद्यापही या पुस्तकाचा समावेश असल्याचे दिसून येते.
मधल्या काळात त्यांच्या या पुस्तकाचे वितरण थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपल्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी विखेंची इच्छा होती, त्यामुळे मोदींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आल्याचे आता सांगण्यात येत आहे. मधल्या काळात राज्यात आणि विखे घराण्यातही बरेच राजकीय बदल झाले. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मागील वेळी जेव्हा हे पुस्तक आले आणि विखे यांचे निधन झाले, तेव्हा विखे परिवार काँग्रेससोबत होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अन्य राजकारणासोबतच या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पंतप्रधानांची तारीख मिळणेही त्यांच्यासाठी सोपे झाले.
या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले तेव्हा राज्यात वेगळी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे त्यात डॉ.विखे यांनी जे काही लिहिले आहे, त्याची चर्चा होणे सहाजिक आहे. पूर्वी जेव्हा हे पुस्तक आले होते, तेही अनेकांनी वाचले. मात्र आता होत आहे तेवढी यावर चर्चा झाली नव्हती. त्यामुळे प्रकाशनाचे टायमिंगही साधले गेल्याचे बोलले जाते. जुनेच पुस्तक नव्याने प्रकाशित झाल्यानंतर त्यात काही बदल आहेत का, हे अद्याप समोर आलेले नाही.