श्रीरामपूरात श्रमिक महासंघाच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणांचा केला तीव्र निषेध

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
केंद्रीय कामगार संघटना व विविध 250 शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी आणि जनविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या (संलग्न एक्टू) नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर गुरुवारी (ता.26) मोर्चा काढून निदर्शन करण्यात आले. या मोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतमजूर, वैद्यकीय कर्मचारी, हमाल-मापाडी, औद्योगिक कामगार आदिंनी सहभाग घेतला. मोदी सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे राज्याध्यक्ष कॉ.बाळासाहेब सुरुडे म्हणाले, कामगारांचे आर्थिक शोषण थांबवून सर्वांना 21 हजार रुपये किमान वेतन मिळायला हवे, त्यातही शासकीय-निमशासकीय क्षेत्रातील कंत्राटी व मानधनी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे. सर्वांना सेवानिवृत्ती वेतन आणि सामाजिक सुरक्षा द्यावी, कामगार विरोधी चार श्रमसंहिता व शेतकरी विरोधी कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत. अन्यथा भविष्यात मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात कामगार व श्रमिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. लाल निशाण पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉ.राजेंद्र बावके म्हणाले, गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगारांचे शोषण वाढून शेतकरी देशोधडीला लागले आहेत. तसेच विविध सरकारी उद्योग, शेती देशी-विदेशी कंपन्यांच्या खिशात घालण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या विरोधात कामगार, शेतकरी व कष्टकरी जनतेने एकत्र येऊन मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.

याप्रसंगी कॉ.जीवन सुरुडे, नर्सिंग यूनियनचे मनोज बारसे, हमाल पंचायतचे आनंद साळवे, इंदुबाई दुशिंग यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी तर मोर्चाचा समारोप भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून कॉ.धनंजय कानगुडे यांनी केला. मोर्चा यशस्वीतेसाठी कॉ.फैय्याज इनामदार, धनंजय कानगुडे, राहुल दाभाडे, प्रकाश भांड, उत्तम माळी, रामा काकडे, संतोष केदारे, विष्णू थोरात, शोभा वीसपुते, ज्योती लबडे, अनिता परदेशी, निर्मला चांदेकर, सुनील शेळके, दिनकर घुले, विठ्ठल चौधरी, नदीम पठाण, अनिल गायकवाड, प्रकाश त्रिभुवन आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 11 Today: 1 Total: 115622

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *