सोनगाव जिल्हा बँक शाखेतील सोने पडताळणी प्रकरणाला वेगळे वळण

सोनगाव जिल्हा बँक शाखेतील सोने पडताळणी प्रकरणाला वेगळे वळण
शाखाधिकारी व सुवर्णपारखीने संगनमताने खर्‍या दागिन्यांचा अपहार केल्याचा कर्जदाराचा खुलासा
नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खर्‍या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला असल्याचा खुलासा सोनेतारण कर्जदार बिपीन ताठे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यामुळे आता जिल्हा बँकेच्या सोने पडताळणी प्रकरणाला वेगळे वळण लागल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेने नुकतेच सोनगाव शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी केली. त्यात तब्बल 134 कर्जदारांचे सोने बनावट आढळून आले होते. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कर्जदार व सुवर्णपारखी यांच्याविरुद्ध बँकेतर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात एका कर्जदाराने बँकेच्या तत्कालीन शाखाधिकार्‍याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने, बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना कर्जदार ताठे म्हणाले, माझ्या एकत्र कुटुंबातील सोन्याचे दागिने 2 जानेवारी, 2019 रोजी सोनगाव शाखेत तारण ठेवून 1 लाख 95 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यावेळी बँकेच्या अधिकृत सुवर्णपारखींनी दागिन्यांची पडताळणी करून मूल्यांकन केले. त्यानुसार तत्कालीन शाखाधिकार्‍यांनी बँक नियमाप्रमाणे कर्ज दिले. त्यानंतर वेळोवेळी बँकेच्या कर्जाचे हप्ते भरले; मात्र कोविड संकटात कर्जहप्ते भरता आले नाहीत. बँकेने हप्ते भरण्याबाबत नोटीस पाठविली.

कुवतीनुसार हप्त्याची रक्कम भरली. बँकेतर्फे सोने पडताळणीसाठी वकिलाची नोटीस मिळाली. 31 ऑक्टोबर रोजी राहुरी येथे बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात सोने पडताळणीसाठी उपस्थित राहिलो. त्यावेळी पंचांसमक्ष सोन्याची पिशवी उघडताना सोन्याच्या बांगड्या व गंठण बदलल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्याचवेळी मी आक्षेप घेतला; परंतु बँकेच्या सोने पडताळणी प्रक्रियेत बाधा येऊ दिली नाही. माझ्या दागिन्यांची अफरातफर करून अपहार करण्यात आला आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे ताठे यांनी सांगितले.

बँकेचे कर्जदार बिपीन ताठे यांच्यासमक्ष सोने पडताळणी झाली आहे. त्यात त्यांनी तारण ठेवलेले सोन्याचे काही दागिने बनावट आढळले असल्याने तसा पंचनामा करून त्यांची सही घेतली आहे. दागिने बदलल्याबाबत त्यांची तक्रार बँकेला मिळाली असून, वरीष्ठ कार्यालयातर्फे याची रीतसर चौकशी होईल.
– प्रवीणकुमार पवार (शाखाधिकारी, जिल्हा सहकारी बँक सोनगाव)

 

Visits: 94 Today: 1 Total: 1101560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *