साईबाबा संस्थानच्यावतीने मंगळवारी रक्तदान शिबीर
साईबाबा संस्थानच्यावतीने मंगळवारी रक्तदान शिबीर
गरजुंना रक्ताची निकड भासत असल्याने घेतला निर्णय
नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू रुग्णांसाठी रक्ताची निकड भासत आहे. तर, दुसरीकडे अनलॉकमुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणार्यांची संख्या वाढू लागली असून दैनंदिन रुग्णांकरीता अथवा प्लॅन शस्त्रक्रिया तसेच तातडीच्या शस्त्रक्रियांकरिता रक्ताची टंचाई भासत चालली आहे. ही टंचाई काही प्रमाणात दूर व्हावी, यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्यावतीने 24 नोव्हेंबर रोजी साईआश्रम-एक निवासस्थान येथील शताब्दी मंडपामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने लॉकडाऊन केले होते. सध्या लॉकडाऊन हळूहळू हटविण्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे दैनंदिन रुग्णांकरीता अथवा प्लॅन शस्त्रक्रिया, तातडीच्या शस्त्रक्रियांकरिता रक्ताची टंचाई भासत चालली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी शिर्डी संस्थानने पुढाकार घेतला आहे.

श्री साईबाबा संस्थानची श्री साईनाथ रक्तपेढी ही महाराष्ट्रातील नामांकित रक्तपेढी असून अहमदनगर जिल्ह्यातील जवळजवळ निम्याहून अधिक रक्तपुरवठा या रक्तपेढीमार्फत करण्यात येतो. सध्याच्या स्थितीला श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नाही. तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू रुग्णांसाठी रक्तांची निकड लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्थानच्यावतीने येत्या मंगळवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रक्तदान शिबिरामुळे रक्ताची टंचाई काही प्रमाणात कमी होणेस नक्कीच मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त व संस्थान कर्मचार्यांनी या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची दिल्लीत चिन्हे दिसू लागली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. येणारे भक्त देखील यामध्ये सहभागी होऊ शकतील. लोकांच्या सेवेसाठी हा उपक्रम आपण करीत आहोत.
– कान्हुराज बगाटे (मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थान)

