साईभक्तांसाठी संस्थान घेणार लवकरच महत्त्वाचा निर्णय!

साईभक्तांसाठी संस्थान घेणार लवकरच महत्त्वाचा निर्णय!
दररोज आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ देण्यासाठी नियोजन सुरू
नायक वृत्तसेवा, शिर्डी
टाळेबंदीच्या काळात बंद करण्यात आलेले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदीर राज्य सरकारच्या आदेशानंतर दिवाळी पाडव्याच्या मुर्हूतावर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरामध्ये एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात आहे. मात्र, आता दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, यादृष्टीने शिर्डी संस्थानने नियोजन सुरू केले आहे.

कोरोना महामारी संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारच्यावतीने टाळेबंदी करण्यात आली. यामुळे 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदीर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरला राज्य सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील मंदीर उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी दिवसभरात सहा हजार भाविकांना दर्शनाकरिता प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता गेल्या दोन दिवसांतील परिस्थितीचा अभ्यास करता दर्शनाचा लाभ अधिक भाविकांना देणे शक्य असल्याचे चित्र आहे. त्यानुसार संस्थानने नियोजन सुरू केले आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी याबाबत बोलताना सांगितले, ‘सध्या सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात असून ही संख्या वाढवता येऊ शकते. कारण भक्तांचे आपल्याला चांगले सहकार्य मिळत आहे. सध्या दर्शन मंडपात (गाभार्‍यात) गेल्यानंतर एक भक्त सरासरी पाच मिनिटे त्या परिसरात राहतो. एकावेळी जवळपास सत्तर भक्त दर्शन मंडप परिसरात फिरत असतात व श्री साईबाबांच्या समाधी जवळ एक भक्त पाच ते दहा सेकंद थांबतो. त्यामुळे आपण ठरवल्यापेक्षा दोन ते तीन हजारांनी दर्शन घेणार्‍यांची संख्या जास्त होऊ शकते. साधारणपणे हा आकडा नऊ हजारापर्यंत वाढू शकतो, तसा आवाका आम्हांला आला आहे. दोन दिवसात तसा अंदाज आला आहे. लवकरच याबाबत वेबसाइटला माहिती देणार असून दर्शन घेणार्‍यांची संख्या वाढवण्याची कार्यवाही प्रत्यक्ष मूर्तरूपात आणू.’

 

Visits: 155 Today: 3 Total: 1101708

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *