धक्कादायक! जिल्ह्यात मागील तेरा दिवसांत तब्बल शंभर रुग्णांचा मृत्यू
धक्कादायक! जिल्ह्यात मागील तेरा दिवसांत तब्बल शंभर रुग्णांचा मृत्यू
आत्तापर्यंत दोनशे रुग्णांचा मृत्यू तर दुसरीकउे बाधितांच्या संख्येतही भर
नायक वृत्तसेवा, नगर
जगभर धुमाकूळ घालणार्या कोरोना विषाणूंमुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे. मार्चपासून आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोनशे झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्याचा विचार केल्यास मार्चपासून ते आठ ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 100 होती. यामुळे मागील तेरा दिवसांत कोरोनामुळे तब्बल 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढू लागल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे.
![]()
आजपासून शनिवार (ता.22) गणेशोत्सव सुरू होत आहे. यामध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. तसेच 30 ऑगस्टला मोहरम आहे. या दोन्ही सण-उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणार्यांची संख्याही आता हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे या सण-उत्सव काळात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

दरम्यान, 12 मार्चला अहमदनगरमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. हा रुग्ण 29 मार्चला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर हळूहळू बाधितांची संख्या वाढत असली तरी जून महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. जुलै व ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तर सातत्याने पाचशेवर बाधित एकाच दिवसात सापडत आहे. मागील चार दिवसांचा विचार केल्यास 17 ते 20 ऑगस्ट या काळातच तब्बल 2 हजार 111 करोना रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात वाढले आहेत. यामध्ये 17 ऑगस्टला 363, 18 ऑगस्टला 681, 19 ऑगस्टला 650 व 20 ऑगस्टला 417 कोरोनाबाधित वाढले आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता.21) दुपारी आणखी 67 कोरोनाबाधित वाढले आहेत. त्यामुळे आता एकूण बाधितांचा आकडा हा 15 हजार 401 झाला आहे. यापैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 हजार 609 झाली असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही 2 हजार 592 एवढी आहे. तर, कोरोनामुळे 200 जणांचा मृत्यू झाला आहे.

