अमृतवाहिनीत  युवा महोत्सव जल्लोष २०२५ उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्तेने देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन युवा जल्लोष २०२५ हा संस्मरणीय ठरवला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष २०२५ हा विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. यावेळी पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश,अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव,जिल्हा समन्वय प्रा.प्रताप फलफले,डॉ.रमेश पावसे, डॉ.अशोक मरकड आदी उपस्थित होते.

या युवा जल्लोष २०२५ कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील १४३१ स्पर्धक व ६०० सहाय्यक यांनी सहभाग घेतला. या महोत्सवात २७ कला प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये भारतीय समूह गायन,शास्त्रीय गायन,उपशास्त्रीय गायन, स्वर वाद्य, वादन,तालवाद्य वादन, पाश्चिमात्य वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य,एकपात्री,अभिनय,एकांकिका,नकला, प्रश्नमंजुषा,वकृत्व स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,कात्रण कला,पोस्टर मेकिंग,माती कला,व्यंगचित्र,रांगोळी, मेहंदी,स्थळ छायाचित्र,मांडणी कला यांचा समावेश होता.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हे ऑटोनॉमस झाले असून विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी आले असून एकत्रित होणारा हा युवा जल्लोष अमृतवाहिनीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे शरयू देशमुख यावेळी म्हणाल्या. 
Visits: 83 Today: 3 Total: 1108315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *