आमदार थोरातांच्या नेतृत्वातच सदैव काम करणार ः राऊत राजहंस दूध संघाच्या अतिथीगृहात मान्यवरांनी केला सत्कार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून संगमनेर तालुक्याचा राज्यात लौकिक वाढवला आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही कायम काँग्रेसचीच विचारधारा जपली असून यापुढील काळातही आमदार थोरात यांच्याच नेतृत्वाखाली सदैव काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन घुलेवाडीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच निर्मला राऊत यांनी केले आहे.

घुलेवाडीच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर निर्मला राऊत व त्यांचे पती कैलास राऊत यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची राजहंस दूध संघाच्या अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच घुलेवाडी येथे झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत निर्मला राऊत अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना राऊत म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा सन्मान संपूर्ण राज्यात होतो आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. घुलेवाडी हे गाव अत्यंत महत्त्वाचे असून दिवसेंदिवस नागरिकांची या गावात राहण्यासाठी मोठी पसंती आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळावा याकरीता आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. घुलेवाडी गावाला नुकतीच 87 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. त्याचबरोबर नवीन वैभवशाली न्यायालय इमारत, विविध रस्ते, पोलीस वसाहत यांचेसह अमृत उद्योग समूहातील महत्त्वाच्या संस्था या गावात आहेत.
![]()
त्यामुळेच आमदार थोरात यांच्या नेतृत्वाचा सार्थ अभिमान आमच्या कुटुंबियांना कायम राहिला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही लोकशाहीचा पाया आहे. लोकशाहीमध्ये मतमतांतरे असतात. मात्र मनभेद नसतात. निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी काम करायचे हा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व आमदार बाळासाहेब थोरात विचार घुलेवाडी गावाने कायम जपला आहे. या निवडणुकीत मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सार्थ ठरवून गावच्या विकासात अधिकाधिक काम करू असे त्या म्हणाल्या.
