हक्कभंगाच्या धास्तीने पालिकेवर उद्घाटन नाकारण्याची नामुष्की! काटशहच्या नादात लोकनियुक्त आमदारांनाच वगळले; गाजावाजा करीत झाला होता सोहळा..


श्याम तिवारी, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन संगमनेरचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. पालिकेतील सत्ताधारीगटाने राजकीय काटशह देण्याच्या नादात स्थानिक लोकनियुक्त आमदारांना ‘खड्या’प्रमाणे बाजूला ठेवून या सार्वजनिक वास्तूचा उद्घाटन सोहळा परस्पर उरकला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात नावाजलेल्या नाट्यकृतीही सादर झाल्या. माजीमंत्र्यांसह विधान परिषदेचे आजी-माजी आमदार, नगराध्यक्षा आणि बोलावण्यात आलेल्या पाहुण्यांनी या वास्तूचे भरभरुन कौतुक करीत देखण्या कोनशिलेसमोर छायाचित्रेही काढली. मात्र हिच छायाचित्रे आता वादाचे कारण बनली असून सरकारी निधीतून साकारलेल्या या सार्वजनिक वास्तूच्या उद्घाटन शिलेवरुन स्थानिक लोकनियुक्त आमदारांना काट मारुन त्यांच्या जागी केवळ पदवीधर मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचा नामोल्लेख असल्याने नव्या वादाला तोंड फूटले आहे. राजकारणातला शह देण्याच्या नादात पालिकेने राजशिष्टाचारच पायदळी तुडवल्याने पालिका प्रशासनावर आता ‘हक्कभंगाची’ टांगती तलवार आहे. झालेल्या चुकीची उपरती होताच बुधवारी सायंकाळी मुख्याधिकार्‍यांनी घाईघाईत पत्रकारांशी संवाद साधून उद्घाटन झालेच नसल्याचा कांगावा केला, मात्र या वास्तूचे संपूर्ण श्रेय घेण्याच्या प्रयत्नात सत्ताधारीगटाकडून प्रसिद्ध झालेल्या बातम्या, भाषणं आणि छायाचित्रे मुख्याधिकार्‍यांच्या दाव्याला छेद देणारी ठरली आहेत.


कॉटेज रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी वासुदेव कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून 1940 मध्ये संगमनेरात ‘अभिनव नाट्य मंडळा’च्या माध्यमातून रंगभूमीची चळवळ सुरु झाली. पुढे 1980 साली संगमनेर नगरपालिकेने सध्याच्या ठिकाणी कवी अनंत फंदी यांच्या नावाने खुलेनाट्यगृहाची उभारणी केली. त्याकाळी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एकमेव पर्याय म्हणून या नाट्यगृहाने संगमनेरकर कलारसिकांच्या कलेची भूक भागवताना शेकडों नाट्याकृती आणि संगीताच्या मैफली अनुभवल्या. कालांतराने परिपूर्ण व सुसज्ज नाट्यगृहाची गरज निर्माण झाल्याने 2011 मध्ये पूर्वीचे नाट्यगृह पूर्णतः पाडून त्याजागी नव्याने त्याच्या उभारणीचा नारळ फोडला गेला. तीन वर्षात त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला व 2014 मध्ये खुल्या स्वरुपातील नाट्यगृह प्रासंगिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.


त्यानंतर राज्यात सत्तांतर घडल्याने दुसर्‍या टप्प्याच्या कामाला निधीची कमतरता भासू लागल्याने विलंब होवू लागला. मध्यंतरी आघाडी सरकारच्या काळात थोडाफार निधी मिळाल्यानंतर त्याचे काम सुरु होताच राजकीय उलथापालथ होवून राज्यात पुन्हा सत्तांतर घडले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये काँग्रेसचा 40 वर्षांचा अभेद्य बुरुज ढासळला. संगमनेर नगरपालिकेवरही डिसेंबर 2021 पासून प्रशासक आल्याने पदवीधरचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार सत्यजीत तांबे प्रचंड सक्रिय झाले. विधानसभेचा फटका नगरपालिकेतील सत्तेला बसू नये यासाठी त्यांनी नाना शर्थ केली. त्यातून प्रत्येक सार्वजनिक उत्सवात महायुती विरुद्ध थोरात-तांबे असा रस्त्यावरचा संघर्षही उभा राहु लागला आणि त्याचे पर्यवसान पुढे श्रेयवाद निर्माण होण्यातही दिसू लागले.


यासर्व पार्श्‍वभूमीवर पालिकेतील सत्ता कायम ठेवणार्‍या आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने सातकोटींच्या खर्चातून नूतनीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण करुन राजकीय काटशह देण्याच्या नादात कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळाही गेल्या सोमवारी (ता.23) परस्पर उरकला. त्या प्रित्यर्थ नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर तशी कोनशिलाही लावण्यात आली. संगमनेर नगरपरिषदेच्या नावासह बोधचिन्ह असलेल्या या शिलेवर 1980 साली पहिल्यांदा निर्माण झालेल्या या नाट्यगृहाच्या उभारणीतील तत्कालीन पदाधिकार्‍यांचे नामोनिशानही ठेवले गेले नाही. मात्र त्याचवेळी या एकाच कोनशिलेवर 2011 साली झालेल्या भूमीपूजनाचा तारीखवार उल्लेख करुन उद्घाटक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावांसह तत्कालीन मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्षांची नावेही कोरली गेली आहेत.


याच कोनशिलेवर दुसर्‍या बाजूला पहिल्या टप्प्याच्या अनौपचारीक उद्घाटनाचाही उल्लेख असून 7 फेब्रुवारी 2014 रोजी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाल्याच्या उल्लेखासह तेव्हाचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्षांची नावे आहेत. तर, या दोहींच्या मधल्या भागात ‘उद्घाटन सोहळा’ असा स्पष्ट उल्लेख करुन उद्घाटक ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह विद्यमान मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह पालिकेच्या सर्व पदाधिकार्‍यांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण गदारोळात सरकारी निधीतून उभारलेल्या या सार्वजनिक वास्तूच्या कोनशिलेवरुन चक्क स्थानिक लोकनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्याच नावाला काट मारल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्यासह राजशिष्टाचाराचा उघड भंग झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यातून पालिका प्रशासनावर हक्कभंगाची टांगती तलवारही लटकू लागली आहे.


या चुकीची उपरती होताच बुधवारी (ता.25) सायंकाळी पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी घाईघाईत काही पत्रकारांना निमंत्रण पाठवून या चुकीची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जयहिंद लोकचळवळीने आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगांचा आणि त्यासाठी नाट्यगृह भाड्याने मिळण्यासाठी झालेला पत्रव्यवहार, त्यासाठी भरलेल्या शुल्काच्या पावत्या आणि पालिकेने दिलेली परवानगी आदी कागदांचा वापर करुन सोमवारी उद्घाटन.. उद्घाटन म्हणतात तसं काही घडलंच नाही असा कांगावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या उद्घाटन सोहळ्याची सत्ताधारी गटाने केलेली जाहीरात, सोशल रिलबाजी, छायाचित्रांचा भडीमार आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून हाच अधिकृत उद्घाटन सोहळा होता हे सिद्ध होते.


शिवाय पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी कानावर हात ठेवण्याचा जरी प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष कथित उद्घाटनाच्या दिवशी खुद्द त्यांचीच आपल्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसह नाट्यगृहातील उपस्थिती, प्रत्येकाशी हस्तांदोलन करुन स्वागत करण्याची लगबग, छायाचित्रे काढण्याची ओढ, नाट्यगृहातील वावर आणि वक्त्यांच्या मुखातून नामोल्लेख यातून पालिकेने जयहिंदच्या पैशातून नाट्यप्रयोग आयोजित करुन त्याच कार्यक्रमात नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळाही उरकून टाकल्याचे ठळक दिसत असताना, शिवाय प्रसारित झालेल्या निमंत्रण पत्रिकेसह कोनशिलेच्या छायाचित्रातही स्थानिक लोकनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्या नावाचा थांगपत्ताच नसल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फूटले असून यावेळी त्याचे पडसाद थेट विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.


या प्रकरणात पालिका प्रशासनाकडून ‘राजशिष्टाचाराचा’ भंग झाल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी काही पत्रकारांना बोलावून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी (ता.23) झालेला कार्यक्रमनगरपालिकेचा अधिकृत उद्घाटन सोहळा नव्हता. जयहिंद लोकचळवळीने नाट्यप्रयोगांसाठी नाट्यगृह भाड्याने मागीतले होते. त्यासाठी संस्थेने पत्रव्यवहार, केला, शुल्क भरले आणि पालिकेने परवानगी दिली. त्यामुळे ‘त्या’ दिवशी उद्घाटन झालेच नाही अशी विचित्र भूमिका घेतली आहे. त्यातून हा प्रश्‍न आणखी चिघळण्याची शक्यता असून कार्यक्रमापूर्वी व नंतर प्रसिद्ध झालेल्या जाहीराती, बातम्या, सोशल रिल्स, छायाचित्रे यातून सत्ताधार्‍यांनी कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा उरकल्याचे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ दिसत असून राजशिष्टाचाराचा भंग म्हणून अधिकार्‍यांच्या माथी खापर फुटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आमदार अमोल खताळ यांची भूमिकाही महत्वाची असून त्यांनी हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडल्यास पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 2395050

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *